#बीड : 'लाडकी बहीण' योजनेबाबत विरोधक अफवा पसरवत आहेत, असा आरोप करताना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी या योजनेवर टीका करणाऱ्यांवर जोरदार फटकेबाजी केली आहे. तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्मलेल्या महिलांना, श्रीमंतांच्या मुलींना या योजनेचे महत्व काय कळणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसची जनसन्मान यात्रा गुरुवारी बीडमध्ये पोहोचली. यावेळी झालेल्या कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जोरदार फटकेबाजी केली. राज्य सरकारच्या वेगवेगळ्या योजनांचा उल्लेख त्यांनी या भाषणात केला.
केंद्रातून निधी कसा आणायचा हे आम्हाला माहीत आहे.विरोधक कोर्टात जाऊन योजना कशा बंद करता येतील हे पाहत आहेत.लाडकी बहीण योजनेतून तळागाळातील महिलांना मदत केली.काहीजण आमची बदनामी करत आहेत.पण हा अजित दादांचा वादा आहे मी माझ्या बहिणींना कधी फसवणार नाही.
तुम्ही मला राखी बांधलेली आहे लाडकी बहीण योजना ही बहिणींसाठी ओवाळणी आहे. सरकार खात्यातून पैसे काढून घेणार असे विरोधक अफवा पसरवत आहेत मात्र कोणाचाही एक रुपयाही काढून घेतला जाणार नाही. राज्यातील ५२ लाख कुटुंबाना ३ गॅस सिलिंडर मोफत देणार.
याचे पैसे थेट महिलांच्या खात्यात येणार आहेत. गरिबांना गरिबीतून बाहेर काढण्याकरता ही योजना आहे.आम्ही मुलीचे शिक्षण ही मोफत करणार आहोत. सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्या श्रीमंतांच्या मुलींना काय कळणार गोरगरिबांच्या मुलींचे जीवन कसे असते? असा सवालही त्यांनी विचारला.
यावेळी लाडकी बहिणीबरोबर भाऊ दोडका नाही तर तोही लाडका आहे, असे अजित पवार म्हणाले आम्ही शेतकऱ्यांचे वीज बिल माफ केले.शेतकऱ्यांनी पुढचे वीज बिल भरायचे नाही. शेतकऱ्यांना ६ टक्के व्याजाने कर्ज देत आहेत.या सर्व योजना पुढेही सुरू राहणार आहेत, असा शब्द मी तुम्हाला देतो.
योजनांमुळे विरोधकांच्या पोटात दुखू लागले आहे.शेतकऱ्याला रात्री शेतात जायची गरज पडणार नाही. आम्ही दिवसा वीज देणार आहोत. राज्यात गेल्या काही दिवसांपासून महिलांवरील अत्याचारांच्या घटना उघडकीस आल्या आहेत.तसेच मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेचाही सर्वांना धक्का बसला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजानी महिलांचा सन्मान केला होता.महिलांवर अत्याचार हा अक्षम्य गुन्हा आहे, कुणाचाही असो पुढाऱ्यांचा पोट्टा असो त्याला सोडणार नाही, असेही ते म्हणाले.