संग्रहित छायाचित्र
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर दहा ते बारा तरुणांनी पिस्तूल आणि कोयत्याने केलेल्या हल्ल्यात त्यांचा रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास मृत्यू झाला. या हल्ल्यामागे दुसरे तिसरे कोणी नसून वनराज आंदेकर यांची सख्खी बहिण आणि मेव्हणा असल्याचे समोर आले. या घटनेनंतर काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. ही घटना अतिशय गंभीर स्वरूपाची असून राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राहिलेली नाही. पुण्यात रविवारी दोन हत्या झाल्या. हे गँगवार आहे की पोलिटिकल एसोसिएशन? भाजप कोणाला वाचवत आहे? असा सवाल चव्हाण यांनी केला. प्रशासन बिल्डर चालवत आहे की इतर कोणी? देशातील 37% शेतकऱ्यांच्या आत्महत्या केवळ महाराष्ट्रात होतात. हे सरकार अपयशी ठरले असून गृहमंत्री देखील अपयशी ठरले आहे.
दरम्यान, आंदेकर हत्येप्रकरणी संजीवनी जयंत कोमकर (रा. ३०९, नाना पेठ) जयंत लक्ष्मण कोमकर, प्रकाश जयंत कोमकर, गणेश लक्ष्मण कोमकर, सोमनाथ सयाजी गायकवाड (रा. आंबेगाव पठार, धनकवडी) अनिकेत दूधभाते (रा. आंबेगाव पठार, धनकवडी), तुषार उर्फ आबा कदम (रा. धनकवडी) सागर पवार (रा. धनकवडी), पवन करताल (रा. मंगळवार पेठ) सॅम ऊर्फ समीर काळे यांच्यासह आणखी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सूर्यकांत ऊर्फ बंडू राणूजी आंदेकर (वय ६८, रा. सोनाई दादा निवास, नाना पेठ) यांनी फिर्याद दिली आहे.