मिटकरी यांच्यानंतर आव्हाड यांच्या वाहनांवर ठाण्यात हल्ला

अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांच्या गाडीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या वाहनांवर स्वराज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी हल्ला केला.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Fri, 2 Aug 2024
  • 11:22 am
Maharashtra Navnirman Sena, Ajit Pawar's NCP MLA Amol Mitkari, attacked the car, Swarajya Sangathan officials attacked the vehicles, Jitendra Awad

संग्रहित छायाचित्र

संभाजीराजे यांच्यावरील टीकेनंतर स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांचे पाऊल

ठाणे : अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांच्या गाडीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या वाहनांवर स्वराज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी हल्ला केला. ठाणे येथील घरी परतत असताना पोलिसांच्या समोरच तीन कार्यकर्त्यांनी आव्हाड यांच्या गाडीवर हल्ला केला. काही दिवसांपूर्वी कोल्हापूरच्या विशाळगडावर झालेल्या दंगलीनंतर जितेंद्र आव्हाड यांनी माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्यावर टीका केली होती. संभाजीराजेंच्या शरीरात छत्रपती शाहू महाराजांचे रक्त वाहत आहे का, हे तपासावे लागेल, असे विधान आव्हाड यांनी केले होते. या विधानाचा राग डोक्यात धरून स्वराज्य संघटनेकडून आव्हाड यांच्या वाहनावर हल्ला करण्यात आला.

विशाळगडावरील अतिक्रमण हटविण्यासाठी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. त्यांच्याकडून विशाळगड येथे आंदोलनही करण्यात आले. मात्र या आंदोलनानंतर विशाळगडावर काही समाजकंटकांनी तोडफोड केली. यानंतर संभाजीराजेंवर टीका करताना आव्हाड म्हणाले, संभाजीराजेंना आता छत्रपती म्हणणे सोडून द्या. कारण त्यांना वंशपरंपरागत जो अधिकार मिळाला होता, तो पुढे घेऊन जाण्याची त्यांची जबाबदारी होती. शाहू महाराज आणि संभाजीराजेंच्या रक्तात काय आहे, हे तपासण्याची गरज आहे.

शाहू महाराजांच्या घराण्यातला माणूस असे विधान करतो की, ज्यामुळे दंगल उसळते, तो शाहू महाराजांच्या घरातील असूच शकत नाही. त्यामुळे त्यांना छत्रपती कुणी म्हणावे, याचा विचार झाला पाहिजे. ज्यांच्याकडे कर्तृत्व आहे, त्यांना छत्रपती म्हणावे. आताचे शाहू महाराज यांना मी नक्कीच छत्रपती म्हणेण. कारण त्यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून लोकांची माफी मागितली. जे राजेघराण्यातील लोकांनी करायला पाहिजे, ते शाहू महाराजांनी केले, असेही आव्हाड म्हणाले.

आव्हाड काय म्हणाले?

हल्ल्यानंतर माध्यमांना प्रतिक्रिया देताना आव्हाड म्हणाले, तीन जणांनी आज माझ्या गाडीवर हल्ला केला. माझ्याजवळ चार पोलीस होते. मी त्या तरुणांना प्रतिकार करण्यास त्यांना सांगितले नाही. मी अशा भ्याड हल्ल्यांना घाबरणार नाही. मी विशाळगडाबाबत बोललो, कारण छत्रपती शाहू महाराजांनी समतेचा जो वारसा दिला आहे, तो संभाजीराजेंनी पुढे न्यायला पाहिजे होता. पण त्यांनी केवळ बोलघेवडेपणा केला. माझ्या गाडीवर हल्ला करून मी शांत बसेन असे तुम्हाला वाटत असेल, पण तसे होणार नाही, मी आणखी त्वेषाने तुमच्याविरोधात बोलणार आहे. आतापर्यंत तुम्हाला आदरार्थी बोलत होतो, आता मी बोलण्यासाठी मोकळा आहे.”

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest