'अभिनेत्री पांडे कमी वयात सोडून गेली'; अजितदादांनी सोलापुरात वाहिली पूनमला श्रद्धांजली; उपमुख्यमंत्री 'स्टंट'पासून अनभिज्ञ
प्रसिद्ध मॉडेल आणि अभिनेत्री पूनम पांडे (Poonam Pandey) हिचा कर्करोगामुळे मृत्यू झाल्याची 'अफवा' शुक्रवारी (२ फेब्रुवारी) समोर आली होती. खुद्द पूनमच्या सोशल मीडिया अकाउंटवरून ही घोषणा करण्यात आल्यामुळे नेटिझन्स एकाच वेळी दुःखात आणि धक्क्यात होते. शनिवारी दुपारी एक वाजता खुद्द पूनमनेच लाईव्ह येत स्वतःच पेरलेल्या मृत्यूच्या चर्चा खोट्या असल्याचे स्पष्ट केले. केवळ सर्वायकल कॅन्सरबद्दल जनजागृती करण्यासाठी हा 'स्टंट' केल्याची कबुली तिने दिली. मात्र ही ताजी बातमी कदाचित उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यापर्यंत पोहोचली नाही आणि त्यांनी तिच्या मृत्यूबद्दल दुःख व्यक्त करत तिला श्रद्धांजली वाहिली. (Poonam Pandey Death)
सोलापुरात एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. भाषणादरम्यान अजित पवार यांनी दुःख व्यक्त केले. धकाधकीच्या जीवनात काम करताना कधी कोणता आजार होईल, हे आपल्याला सांगता येत नाही. आजच सकाळीच मी बातमी वाचली. एक कमी वयाची पांडे म्हणून एक अभिनेत्री होती, पण तिला गंभीर असा आजार झाला, फार कमी वयात ती आपल्याला सोडून गेली. मला एकच तुम्हाला सांगायचे आहे, तुम्ही स्वतःची काळजी घ्या, आम्ही सरकार म्हणून तुमची काळजी घेऊच, महापालिकाही तुमची काळजी घेईल, असे अजित पवार म्हणाले. कार्यक्रम संपल्यानंतर अजित पवार राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्याच्या घरी स्नेहभोजनासाठी गेले. यावेळी सोबत महिला आघाडीच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर होत्या. माध्यमांनी रुपाली चाकणकर यांच्या ही बाब लक्षात आणून दिल्यावर चाकणकर यांनी पूनम पांडे अजून हयात आहे, असे अजितदादांना सांगितले.