पोलीस ठाण्यातच पोलीस निरीक्षकाची सर्व्हिस रिव्हॉल्वरमधून गोळी झाडून आत्महत्या, पोलीस दलात खळबळ
नाशिक : नाशिक पोलीस दलातून (Nashik Police) हादरवणारी घटना समोर आली आहे. नाशिकच्या अंबड पोलीस (Ambad Police) ठाण्यातील पोलीस अधिकाऱ्याने पोलीस ठाण्यातच स्वतःवर गोळी झाडल्याची धक्कादायक घटना घडली आहे.आज मंगळवार (दि.२०) सकाळी सकाळी साडेनऊ ते पाउणेदहा वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. या घटनेनंतर पोलीस दलात एकच खळबळ उडाली. (nashik news)
अशोक नजन (Ashok Najan) (वय ४०, गोविंद शाळेच्या मागे,इंदिरा नगर,नाशिक) असे आत्महत्या केलेल्या पोलीस निरीक्षकाचे नाव आहे. अंबड पोलीस ठाण्यात कार्यरत होते. (Ashok Najan suicide)
मिळालेल्या माहितीनुसार, अशोक नजन मंगळवारी दिवसपाळीसाठी ते नेहमीप्रमाणे साडेनऊ वाजता पोलीस ठाण्यात आले. हजेरी लावल्यानंतर ते आपल्या कक्षात गेले. दरम्यान, साडेनऊ ते पाउणेदहा वाजेच्या दरम्यान सर्व्हिस रिव्हॉल्वरने गोळी झाडून आत्महत्या केली. त्यानंतर हवालदार शरद झोले हे हजेरीचा अहवाल देण्याकरिता नजन यांच्या कार्यालयात गेले असता त्यांना नजन यांच्याकडे बघून त्यांना हृदयविकाराचा झटका आला असावा असे प्रथमदर्शनी वाटले. मात्र, नंतर त्यांच्या नाकातून रक्त येतांना त्यांना दिसले. यावेळी झोले यांनी तात्काळ पोलीस ठाण्याच्या आवारात पळत जाऊन इतर अंमलदारांना आवाज देवून नजन यांच्या कार्यालयात बोलावले. त्यानंतर सर्वांना नजन यांनी सर्व्हिस रिव्हॉल्वरने गोळी झाडल्याचे दिसून आले. कर्मचाऱ्यांनी त्यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात नेले. परंतु, त्यांचा मृत्यू झाला होता.आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यांनी स्वतःवर गोळ्या झाडताच पोलिसांची मोठी धावपळ उडाली आहे. या घटनेची माहिती समजल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पोलीस ठाणे व जिल्हा रुग्णालयात धाव घेतली.