राज्यात आणखी १३ नवी कारागृहे

नागपूर: राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत असून कारागृहात डांबण्यात येणाऱ्या गुन्हेगारांची संख्याही वाढत आहे. मात्र, कैद्यांच्या तुलनेत कारागृहांची संख्या कमी असल्याने त्यात दुप्पट-तिप्पट कैदी ठेवण्यात येत होते.

संग्रहित छायाचित्र

कैद्यांच्या तुलनेत कारागृहांची संख्या कमी, गुन्हेगारीचेही प्रमाण वाढले

नागपूर: राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत असून कारागृहात डांबण्यात येणाऱ्या गुन्हेगारांची संख्याही वाढत आहे. मात्र, कैद्यांच्या तुलनेत कारागृहांची संख्या कमी असल्याने त्यात दुप्पट-तिप्पट कैदी ठेवण्यात येत होते. मात्र, आता राज्यात जवळपास १५ हजार कैद्यांना सामावून घेण्याच्या क्षमतेचे आधुनिक पद्धतीचे १३ नवीन कारागृह तयार करण्यात येत आहे. (Jails in Maharashtra)

कारागृहात क्षमतेपेक्षा जास्त कैदी ठेवण्याच्या यादीत देशभरातून महाराष्ट्राचा चौथा क्रमांक लागतो. पहिल्या क्रमांकावर उत्तर प्रदेश-बिहार यांचा क्रमांक लागतो. सध्या राज्यात ६० कारागृहे असून त्यात २६ हजार ३७७ बंदिवान ठेवता येतील एवढी क्षमता आहे. मात्र, कारागृहात क्षमतेपेक्षा जवळपास दीडपट म्हणजेच ४० हजार ४८५ कैदी बंदिस्त आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून कारागृहात कैद्यांमध्ये मारामारी किंवा टोळीयुद्ध होत असल्याच्या घटना घडत आहेत. एकमेकांवर प्राणघातक हल्ला करणे किंवा खून करण्यापर्यंत घटना घडत आहेत. तसेच कारागृहातील पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवरही कैदी हल्ले करीत असल्याच्या अनेक घटना राज्यभरातून समोर आल्या आहेत. राज्यात उपलब्ध कारागृहात क्षमतेपेक्षा कैदी असल्यामुळे कुख्यात कैद्यांसह साधे कैदीही एकाच बरॅकमध्ये ठेवण्यात येतात. त्यामुळे कुख्यात कैद्यांकडून नेहमी न्यायाधीन कैद्यांवर अत्याचार होत असतात. कारागृहात होणाऱ्या घटना टाळण्यासाठी नवीन कारागृहांची निर्मिती करण्याचा प्रस्ताव राज्य कारागृह विभागाने गृहमंत्रालयाला दिला होता. त्यावर लगेच अंमलबजावणी करीत जवळपास नवीन १३ कारागृहे निर्माण करण्याचा प्रस्ताव मंजुरीच्या प्रक्रियेत आहे. सध्या राज्यात ९ मध्यवर्ती कारागृहे असून त्यात कल्याण आणि लातूर मध्यवर्ती कारागृहाची भर पडणार आहे. कल्याण आणि लातूर दोन्ही जिल्हा कारागृह होते, परंतु आता मध्यवर्ती कारागृहात रूपांतरित करण्यात आले असून लवकरच उद्घाटन करण्यात येणार आहे.

आधुनिक असतील नवी कारागृहे

हिंगोली, ठाणे, गोंदिया, जळगाव-भुसावळ, पालघर, तुर्भे, येरवडा, नगर-नारायणडोह, नांदेड, अलिबाग, बीड, सातारा आणि सांगली या जिल्ह्यात नव्याने कारागृह उभारण्यात येणार आहेत. शासनाकडून जमीन अधिगृहित करण्यात आली असून लवकरच नव्या कारागृहाच्या निर्माणकार्याला सुरुवात होणार आहे. वरील सर्व कारागृहे आधुनिक पद्धतीची असतील. त्यामुळे कैदी पळून जाणे किंवा मारामारी करण्याच्या घटनांवर नियंत्रण येईल.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest