संग्रहित छायाचित्र
गडचिरोली जिल्ह्यातील जारावंडी क्षेत्रात असलेल्या छत्तीसगड सीमेलगतच्या जंगल परिसरात बुधवारी (दि. १७) दुपारी पोलिसांनी चकमकीत १२ नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले.
या कारवाईत एक उपनिरीक्षकासह दोघे जण जखमी झाले आहेत. उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे गडचिरोली जिल्हा दौऱ्यावर होते. त्यांनी जिल्हा सोडताच दुपारी दोनच्या सुमारास घनदाट जंगलात हा थरार घडला.
इंटला गावाजवळ १२ ते १५ नक्षलवादी तळ ठोकून असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. सकाळी १० वाजता गडचिरोली ऑपरेशन सुरू करण्यात आले. ‘सी ६०’ दल वांडोली गावातील छत्तीसगड सीमेजवळ पाठवण्यात आले. त्यांनी ही कारवाई पार पाडली.
‘सी ६०’ दल या कारवाईत आतापर्यंत तीन एके ४७, दोन इन्सास, एक कार्बाइन, एक एसएलआर यासह सात ऑटोमोटिव्ह शस्त्रं जप्त केली आहेत. ठार झालेल्या १२ नक्षलवाद्यांपैकी दोघांची ओळख पटली आहे. यात टिपागड (ता. कोरची) दलमच्या विभागीय समितीचा सदस्य लक्ष्मण आत्राम, विशाल आत्राम यांचा समावेश आहे. उर्वरित दहा जणांची ओळख पटविण्याचे काम सुरु आहे.
‘सी ६०’चा एक पोलीस उपनिरीक्षक आणि एक जवान जखमी झाला आहे. त्यांना पुढील उपचारासाठी नागपूरला हलवण्यात आले. गडचिरोलीचे पालकमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी हे ऑपरेशन यशस्वीपणे पार पाडणारे ‘सी ६०’चे कमांडो आणि गडचिरोली पोलीस यांना ५१ लाख रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले आहे.