संग्रहित छायाचित्र
पुणे : पुणे जिल्हा परिषदेचे आरोग्य आणि बांधकाम विभागाचे माजी सभापती मंगलदास बांदल यांच्या पत्नी रेखा यांच्या मोटारीची काच फोडून चोरट्याने ४० हजार रुपयांची रोकड, एक पर्स, पासपोर्ट, दोन डेबिट कार्ड, आधार कार्ड आणि पॅन कार्ड असा मुद्देमाल लंपास केला. ही घटना बुधवारी संध्याकाळी साडेपाच ते साडेसहा वाजण्याच्या दरम्यान पुणे-नगर रस्त्यावरील खराडी बायपास चौकाच्या अलीकडे असलेल्या अल्फा डायग्नोस्टिक समोर घडली. या प्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात आरोपी विरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रेखा बांदल या जिल्हा परिषदेच्या सदस्या आहेत.
याप्रकरणी रेखा मंगलदास बांदल (वय ४२, रा. बांदल कॉम्प्लेक्स मागे, शिक्रापूर) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेखा बांदल या सामाजिक कार्यकर्त्या आहेत. त्या तळेगाव ढमढेरे-रांजणगाव सांडस या जिल्हा परिषद गटाच्या जिल्हा परिषद सदस्य देखील आहेत. बुधवारी संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास त्या अमोल भोसले यांच्यासह खराडी येथील श्रीराम सोसायटीमध्ये मैत्री साम्राज्य ग्रुपने आयोजित केलेल्या दहीहंडी उत्सवाच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून आलेल्या होत्या.
त्यांनी त्यांची कार अल्फा डायग्नोस्टिक्स समोर सार्वजनिक रस्त्यावर लॉक करून पार्क केलेली होती. दहीहंडीचा कार्यक्रम झाल्यानंतर त्या साडेसहाच्या सुमारास कार जवळ आल्या. त्यावेळी त्यांना कारची डाव्या बाजूची काच फुटलेली दिसली. त्यांनी कारचे लॉक उघडून पाहिले असता मागील सीटवर ठेवलेल्या साहित्यामधील पर्स गायब होती. अज्ञात चोरट्याने त्यांच्या कारमधील पर्स काच फोडून चोरून नेली. या पर्समध्ये ४० हजार रुपयांची रोकड, पासपोर्ट, दोन डेबिट कार्ड आणि आधार कार्ड, पॅन कार्ड होते. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप करपे करीत आहेत.