बेकायदा पिस्तूलासह तरुणाला अटक
पुणे : गणेशोत्सव काळामध्ये बेकायदा गावठी कट्टा आणि काडतुसे बाळगणाऱ्या आरोपीला भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने जरबंद केले आहे. त्याच्याकडून एक बेकायदा पिस्तुल आणि तीन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सतीश गुलाबराव शेळके (वय २३, सध्या रा. शिरवळ, ता. खंडाळा, मुळगाव छिंदवाडा, मध्य प्रदेश) असे अटक आरोपीचे नाव आहे. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या तपास पथकाचे अधिकारी आणि कर्मचारी गस्त घालित असताना अंमलदार मंगेश पवार आणि निलेश खैरमोडे यांना खबऱ्यामार्फत आरोपीची माहिती मिळाली. सतीश शेरके हा कात्रज घाटातील भिलारेवाडी येथील पेट्रोल पंपाच्या समोरच्या बाजूला उभा असून त्याच्याकडे पिस्तूल असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
त्यानुसार पोलिसांनी पेट्रोल पंपाच्या पुढील बाजूला शंभो शंकर मिसळ हाऊसच्या आसपास त्याचा शोध घ्यायला सुरुवात केली. कात्रज घाटाच्या चढाच्या रस्त्यावर तो उभा होता. त्याला ताब्यात घेऊन अंगझडती घेतली असता ४० हजार रुपयांचे गावठी बनावटीचे पिस्तूल आणि तीन जिवंत काडतुसे आढळून आली. ही अग्निशास्त्र जप्त करण्यात आली आहेत. ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक विनायक गायकवाड, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय पुराणिक, गिरीश दिघावकर, सहायक निरीक्षक अमोल रसाळ, उपनिरीक्षक धीरज गुप्ता यांच्या पथकाने केली.