ससूनमधील वॉर्ड क्रमांक १६ चे गौडबंगाल उघडकीस येणार
अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठीचा (व्हीआयपी) वॉर्ड बंद करून तो कैद्यांचा वॉर्ड (Ward of prisoners)करण्यापासून ते अनेक महिने धनदांडगे कैदी आरामात राहण्यामागे ससून (Sassoon Hospital)मधील वॉर्ड क्रमांक १६ मधील गौडबंगाल उघडकीस येणार आहे. ड्रग तस्कर ललित पाटील पलायनप्रकरणीLalit Patil) चौकशीसाठी समिती नेमली आहे. ससूनच्या अधिष्ठात्यांपासून वैद्यकीय अधीक्षक, वॉर्ड क्रमांक १६ मधील कर्मचारी यांची समितीने कसून चौकशी केली.
राज्य सरकारने नेमलेल्या समितीच्या अध्यक्षपदी वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे प्रभारी संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर आहेत. समितीच्या सदस्यपदी सोलापूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख, नांदेडमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील न्यायवैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. हेमंत गोडबोले आणि मुंबईतील ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अस्थिव्यंगोपचार विभागाचे प्रमुख डॉ. एकनाथ पवार हे आहेत. समितीने अधिष्ठाता (डीन) डॉ. संजीव ठाकूर यांची चौकशी केली. वैद्यकीय अधीक्षक डॉ. किरणकुमार जाधव, कैदी रुग्ण समितीचे अध्यक्ष डॉ. सुजीत धिवारे, कैदी रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर, वॉर्ड क्रमांक १६ मधील कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यात आली. अधिष्ठाता, वैद्यकीय अधीक्षक आणि कैदी रुग्ण समिती अध्यक्षांकडून लेखी अहवाल मागविण्यात आला आहे. २०२० पासून आतापर्यंत ससून रुग्णालयात दाखल झालेल्या कैदी रुग्णांची माहिती तपासली जाणार आहे. त्यामध्ये कैदी रुग्ण, त्यांचा आजार, उपचार, रुग्णालयात दाखल असलेला कालावधी, उपचार करणारे डॉक्टर आदी माहितीचा समावेश आहे.
ललित पाटील पलायनप्रकरण उघडकीस आल्यानंतर ससूनमध्ये उपचारांच्या नावाखाली ठाण मांडून बसलेल्या १२ कैद्यांची पुन्हा येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली. शिवाजीराव भोसले सहकारी बँकेच्या गैरव्यवहारातील आरोपी माजी आमदार अनिल भोसले, गुंड रुपेश मारणे, बलात्कार प्रकरणातील आरोपी हेमंत पाटील, प्रवीण राऊत आणि प्रकाश चावला यांच्यासह १२ कैद्यांची पुन्हा येरवडा कारागृहात रवानगी झाली. हे कैदी मागील अनेक महिने उपचारांसाठी ससून रुग्णालयात दाखल होते. पैशांच्या जोरावर वॉर्ड १६ मध्ये त्यांनी अनेक दिवस मुक्काम केला. उपचाराचे कारण देऊन ससून रुग्णालयात ते भरती झाले होते. कारागृह प्रशासन आणि ससून रुग्णालयातील अधिकाऱ्यांना त्यांनी पैसे चारल्याचीही चर्चा आहे.
हायप्रोफाइल कैद्यांसाठी ससून रुग्णालय आश्रयस्थान बनले आहे. ड्रग्ज रॅकेट चालवणाऱ्या ललित पाटीलने रुग्णालयातील अधिकारी, कर्मचारी, पोलीस गार्ड व अधिकाऱ्यांना मोठ्या प्रमाणावर पैसे दिले. तो ससून रुग्णालयात जूनपासून आजारपणाच्या नावाखाली दाखल होता.
व्हीआयपी वॉर्ड केला कैद्यांसाठी
ससून रुग्णालयात जुन्या इमारतीत चौथ्या मजल्यावर असलेला वॉर्ड क्रमांक १६ अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी होता. या ठिकाणी स्पेशल रूम होत्या. नागरिकांनाही नंबर लावून प्रतीक्षा यादीप्रमाणे या वॉर्डमध्ये प्रवेश मिळत असे. मात्र, कोरोनाच्या काळात हा वॉर्ड बंद करण्यात आला. या ठिकाणी कैद्यांना ठेवण्यास सुरुवात केली. एका बाजूला आणि बंदिस्त असल्याने या वॉर्डची कैद्यांसाठी निवड झाल्याचे अनेकांना वाटत होते. मात्र, आता त्याचे गौडबंगाल समोर आले आहे.