पोलिसांनी लावला नव्या शिक्षेचा शोध: कल्याणीनगरमध्ये नाकाबंदीत दोषी आढळलेल्या तरुणाला पोलीस अधिकाऱ्याकडून पाय चेपायला लावण्याची शिक्षा

कल्याणीनगर भागात झालेल्या अपघाताच्या घटनेनंतर भरधाव वाहन चालविणारे वाहनचालक, तसेच मद्यपी वाहनचालकांविरुद्ध कारवाई करण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून अचानक नाकाबंदी करण्यात येत आहे. त्याप्रमाणे कल्याणीनगर भागात शनिवारी रात्री वाहतूक पोलिसांनी नाकाबंदी केली होती. वाहनचालकांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात येत होती.

कल्याणीनगरमध्ये नाकाबंदीत दोषी आढळलेल्या तरुणाला पोलीस अधिकाऱ्याकडून पाय चेपायला लावण्याची शिक्षा

व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर नागरिकांनी व्यक्त केला संताप; पायाला क्रॅम्प आल्याने मसाज केल्याची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून सारवासारव

चैत्राली देशमुख-ताजणे/अमोल अवचिते - 

नाकाबंदीत ताब्यात घेण्यात आलेल्या एका तरुणाकडून पोलीस अधिकाऱ्याने चक्क पाय दाबून घेतल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेची चित्रफीत समाजमाध्यमातून प्रसारित झाल्यानंतर नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे.  त्या पोलीस अधिकाऱ्याची चौकशी करण्याचे आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले आहेत.

कल्याणीनगर (Kalyani Nagar) भागात झालेल्या अपघाताच्या घटनेनंतर भरधाव वाहन चालविणारे वाहनचालक, तसेच मद्यपी वाहनचालकांविरुद्ध कारवाई करण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून अचानक नाकाबंदी करण्यात येत आहे. त्याप्रमाणे कल्याणीनगर भागात शनिवारी रात्री वाहतूक पोलिसांनी नाकाबंदी केली होती.  वाहनचालकांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात येत होती.

पोलिसांचे (Pune Police) पथक वाहनांची तपासणी करत होते. त्यावेळी एका मोटारीतून तरुण निघाले होते. हे तरुण मूळचे सणसवाडीतील आहेत. पोलिसांनी त्यांची चौकशी केली. गाडीची कागदपत्रे नसल्याने त्यांनी मोटारचालकाला दंड केला. त्यानंतर नाकाबंदीतील पोलीस कर्मचारी मोटारीतील एका तरुणाला घेऊन काही अंतरावर खुर्चीत बसलेल्या अधिकाऱ्याकडे घेऊन गेला. पोलीस अधिकाऱ्याने तरुणाची कानउघाडणी केली आणि नंतर त्याला पाय चेपायला सांगितले.कारवाईच्या भीतीमुळे तरुणाने पोलीस अधिकाऱ्याचे पाय चेपून दिले. त्यानंतर पोलिसांनी त्याची सुटका केली.

कल्याणीनगर अपघात प्रकरण सुरुवातीला पोलिसांनी गंभीरपणे हाताळले नसल्याने आधीच पोलिसांबद्दल रोष आहे. त्यामुळे नाकाबंदीत पकडलेल्या तरुणाकडून पोलीस अधिकारी पाय चेपून घेत असल्याची चित्रफीत समाजमाध्यमातून व्हायरल झाल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी संबंधित पोलीस अधिकाऱ्याची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

यासंदर्भात ‘सीविक मिरर’सोबत बोलताना पोलीस उपायुक्त (वाहतूक) रोहिदास पवार म्हणाले, ‘‘आम्ही व्हायरल व्हीडीओचा तपास करत आहोत. येरवडा वाहतूक विभागातील पीएसआय गोर्डे (वय ५७) हे कल्याणीनगर येथील ॲडलॅब्स चौकात ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’विरुद्ध पोलीस कारवाईत होते. दोन दिवस रात्री आणि दिवसा ड्यूटीवर असल्याने त्यांची साखर ५५० पर्यंत वाढली होती. त्यामुळे त्यांच्या पायात क्रॅम्प आला आणि ते अचानक जमिनीवर बसले. व्हीडीओमधील तरुणाने त्यांच्या पायाला आलेला क्रॅम्प सोडण्यास मदत केली. असे असले तरी आम्ही वस्तुस्थितीची पडताळणी करत आहोत. यासंदर्भात आवश्यक ती कारवाई केली जाईल.’’

‘‘प्रथमिक माहितीच्या आधारे आम्ही आमच्या अधिकाऱ्याकडून काय घडले याची माहिती घेतली आहे. संबंधित पोलीस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार असे दिसते की, त्यांच्या पायात क्रॅम्प आला होता. संबंधित तरुण अधिकाऱ्याला स्वतःच्या मर्जीने मसाज देत होता. पण तरीही आम्ही याचा तपास करत आहोत. संबंधित तरुणांना बोलावले आहे. त्याचे म्हणणेही ऐकून घेतले जाईल. त्याने स्वतःहून पायाला मसाज केला की त्याच्यावर बळजबरी करण्यात आली याचा तपास करण्यात येईल,’’ अशी माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी ‘सीविक मिरर’ला दिली.

सेवानिवृत्त पोलीस अधिकारी अरविंद पाटील म्हणाले, ‘‘व्हीडीओमध्ये फक्त तरुण पोलीस कर्मचाऱ्याला मसाज करताना दिसत असल्याचे दिसून येते. पण त्याआधी आणि नंतर काय झाले, हे समजून घेणे आवश्यक आहे.  सामान्यतः रात्रीच्या ड्युटीदरम्यान पोलिसांचे पाय दुखतात. बऱ्याच वेळा व्यावसायिक मसाज करणाऱ्याला बोलावले जाते. त्यांना त्याची फीदेखील दिली जाते.’

अशा प्रकारची कृती मानवी हक्क उल्लंघनाच्या अंतर्गत येते. गणवेशातील पोलिसाने असे करायला लावणे हा कायद्यानुसार गुन्हा आहे. हे स्पष्टपणे मानवी हक्कांचे उल्लंघन आहे.  पोलिसांची प्रतिमा यामुळे मलीन होते. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी होणे आवश्यक आहे. जरी संबंधित तरुण स्वतःहून मसाज करत असला तरी पोलिसांनी त्याला परवानगी का दिली, हा प्रश्न आहे. 
- ॲड. रमा सरोदे, मानवी हक्क कार्यकर्त्या 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest