मार्केट यार्डमध्ये वाहनांची तोडफोड सर्वसामान्य भयभीत
पुणे : मार्केट यार्ड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहतीमध्ये वाहनांची तोडफोड करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. मध्यरात्री घडलेल्या या प्रकारामुळे आंबेडकर नगर वसाहती मधील नागरिक भयभीत झाले आहेत. यापूर्वी देखील जानेवारी महिन्यात अशाच प्रकारे वाहनांचे टोळक्याकडून नुकसान करण्यात आले होते. दहशत माजविण्याच्या हेतूने वारंवार घडणाऱ्या या घटनांकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे.
स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यरात्री ते पहाटेच्या दरम्यान एका टोळक्याने या ठिकाणी आलेल्या दुचाकी तलवार, कोयते आणि काट्यांच्या साहाय्याने फोडल्या. जवळपास दहा ते बारा वाहनांचे नुकसान झाले आहे. अनेक वाहनांचे हेडलाईन्स फोडण्यात आले आहेत. तर काही ठिकाणी दुचाकीच्या पेट्रोलच्या टाक्यांवर कोयता आणि तलवारीने घाव घालण्यात आले आहेत. या सोबतच काही वाहनांचे टेल लॅम्प देखील तोडण्यात आले आहेत. तर, काही वाहनांच्या सीटवर ब्लेड मारण्यात आले आहेत.
या वसाहतीमध्ये गरीब कष्टकरी जनता राहते. या सर्वांचे हातावरचे पोट आहे. त्यामुळे वाहनांचे नुकसान झाल्यामुळे त्यांना आर्थिक भुर्दंड बसणार आहे. यासंदर्भात सर्व नागरिकांनी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार करण्याचा निर्णय घेतला आहे. पोलिसांनी यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी या भागातील नागरिक करीत आहेत. वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या टोळक्याची दहशत मोडीत काढण्याचे आव्हान मार्केट यार्ड पोलिसांपुढे आहे.