कमी वर्गणी देणे चहावाल्याला भोवले
गणेशोत्सवात गणेश मंडळाला स्वइच्छेने वर्गणी दिल्याने मंडळाच्या कार्यकर्त्यांनी एका किरकोळ व्यावसायिकास बेदम मारहाण करत धंदा बंद पाडण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
ही घटना शनिवारी (दि. २३) कॅम्प परिसरात घडली. या प्रकरणी चहाविक्रेते गणेश संतोष पाटणे (वय ३७, रा. शिवगंगा अपार्टमेंट) यांनी लष्कर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्याआधारे पोलिसांनी गुंडागर्दी करणाऱ्या मंडळाच्या दोन कार्यकर्त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कॅम्प परिसरातील महात्मा गांधी रस्त्यावर पूना मोटर्सच्या समोर श्रीनाथ टी स्टॉल आहे. हा स्टॉल गणेश संतोष पाटणे हे चालवतात. श्रीनाथ टी स्टॉलवर चहा करून येणाऱ्या ग्राहकांना तो विकतात. तसेच जवळच्या इतर दुकानात गरजेनुसार चहा नेऊन द्यायचे कामही करतात. शनिवारी रात्री सातच्या दरम्यान १५ ऑगस्ट चौकातील गणपती मंडळाचे काही कार्यकर्ते गणेश यांच्या दुकानावर वर्गणी मागण्यासाठी गेले होते. त्यावेळी गणेश यांनी १५१ रुपये वर्गणी कार्यकर्त्यांना स्वखुशीने दिली. मात्र कार्यकर्ते एवढ्यावर समाधानी नव्हते. त्यांनी गणेश यांच्याकडे एक हजार रुपये वर्गणी मागितली. फिर्यादी यांनी एवढी मोठी रक्कम देण्याची माझी ऐपत नसल्याचे सांगत १५१ रुपये वर्गणी स्वीकारावी, अशी विनंती केली. मात्र मंडळाच्या कार्यकर्त्यांना याचा राग आला. त्यांनी फिर्यादी गणेश यांच्या अंगावर धावून जात जोरात त्यांच्या कानशिलात लगावली.
यावेळी आरोपींनी फिर्यादी गणेश यांना बेदम मारहाण करताना ‘‘बघून घेतो तुझा धंदा कसा चालतो ते,’’ अशी धंदा बंद करण्याची धमकी दिली. या प्रकरणी फिर्यादी गणेश यांनी लष्कर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यावर पोलिसांनी विविध कलमान्वये नीलेश दशरथ कणसे (वय ३९, रा. जान मोहम्मद स्ट्रीट, कॅम्प) आणि अविनाश राजेंद्र पंडित (वय ३२, रा महात्मा गांधी रस्ता शिंपी आळी) यांच्यावर गुन्हा दाखल केला. लष्कर पोलीस ठाण्यातील अंमलदार शैलेश भोकरे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.