संग्रहित छायाचित्र
बांधकाम साइटवर सात वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी ७० वर्षांच्या सेवानिवृत्त सरकारी कर्मचाऱ्याला विशेष न्यायालयाने दोषी ठरवून २० वर्षे सक्तमजुरी व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. विशेष न्यायाधीश के. पी. क्षीरसागर यांनी हा निकाल दिला.
पीडित मुलीने आरोपीला न्यायालयात ओळखले, तसेच आरोपीने लैंगिक अत्याचार केल्याची साक्ष न्यायालयासमोर नोंदविली. ‘पीडित मुलगी ही पढवलेली साक्षीदार नसून, तिने विचारलेल्या प्रश्नांची तर्कशुद्ध उत्तरे दिली आहे. तिला शपथेचे महत्त्व माहिती असून, तिची साक्ष विश्वासार्ह व इतर साक्षीदारांच्या साक्षी-पुराव्यांना पुष्टी देते,’ असे नमूद करत न्यायालयाने आरोपीला शिक्षा ठोठावली, तसेच भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम ३९६ नुसार, पीडित मुलीला नुकसान भरपाई देण्याची सूचना पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाला केली.
ही घटना ३१ ऑक्टोबर २०१९ रोजी विश्रांतवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली असून, साडेचार वर्षांनी या खटल्याचा निकाल लागला. पीडित मुलगी आपल्या आजोबांसह बागेत खेळायला जायची. आरोपी तिथे आपल्या श्वानाला घेऊन यायचा. त्याने पीडित मुलीला एका इमारतीच्या बांधकामाच्या ठिकाणी नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर पीडित मुलगी रडत घरी आली. तिने आईला घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी आरोपीला अटक करून त्याच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले.
या खटल्यात विशेष सरकारी वकील नितीन कोंघे यांनी काम पाहिले. त्यांनी सरकार पक्षातर्फे दहा साक्षीदारांची साक्ष नोंदविली. त्यामध्ये पीडिता आणि वैद्यकीय अधिकाऱ्याची साक्ष महत्त्वाची ठरली. आरोपीला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर केले असता, ‘हेच ते डॉगीवाले अंकल’ म्हणून तिने ओळखले. आरोपीने स्वत:ची वासना शमविण्यासाठी हे घृणास्पद कृत्य केले असून, त्यामुले पीडित मुलीला शारीरिक व मानसिक धक्का बसला आहे. आरोपी ज्येष्ठ नागरिक असला, तरी त्याच्यामध्ये सुधारणेची शक्यता नाही. त्यामुळे कोणतीही दयामाया न दाखविता आरोपीला कठोर शिक्षा द्यावी, असा युक्तिवाद विशेष सरकारी वकील कोंघे यांनी केला. तो ग्राह्य धरत न्यायालयाने आरोपीला शिक्षा ठोठावली.
‘ज्येष्ठ नागरिकाला गोवण्याचा हेतू नाही’
‘आरोपी ज्येष्ठ नागरिक असून, त्याचे पीडितेचे कुटुंबीय, तक्रारदार आणि साक्षीदारांशी शत्रुत्व नव्हते. त्यामुळे त्यांचा ज्येष्ठ नागरिकाला गोवण्याचा कोणताही हेतू नसल्याचे स्पष्ट झाले असून, साक्षीदारांचे पुरावे नि:संशय सिद्ध झाले आहेत. पीडितेवर लैंगिक अत्याचार करून आनंद मिळविण्याचा आरोपीचा हेतू होता,’ असे न्यायालयाने निकालात नमूद केले आहे.