थेरगावमध्ये कोयत्यांचा थरार; वाहनांची तोडफोड
थेरगावातील (Thergaon) गणेशनगर भागात हातात कोयते (koyta)घेतलेल्या गुन्हेगारांनी वाहनांची तोडफोड केली. गुरुवारी मध्यरात्री केलेल्या तोडफोडीने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण (Pimpri Chinchwad Crime) पसरले असून सराईत गुन्हेगार गंग्या आणि त्याच्या साथीदारांनी चार वाहनांची तोडफोड केली. याबाबत संदीप प्रभाकर कुलकर्णी (४०, रा. मयूरेश्वर कॉलनी, गणेशनगर) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, रोहन उर्फ गंग्या वासुदेव वाघमारे (वय २८), असद गोलंदाज (वय २०, दोघे रा. लोकमान्य कॉलनी, थेरगाव), समाधान परिहार (वय ३१, रा. लांडेवस्ती, एमआयडीसी भोसरी) यांच्यासह तीन अल्पवयीन मुलांवर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार फिर्यादी गुरुवारी रात्री घरासमोर फेरफटका मारत असताना दोन अल्पवयीन आरोपी तेथे आले. त्यांनी कोयत्याने वाहनांची तोडफोड करीत दहशत माजविण्यास सुरुवात केली. त्यावेळी फिर्यादींनी विचारणा केल्यावर रागावलेल्या सर्व आरोपींनी आपसांत संगनमत करून फिर्यादींना मारहाण केली. तसेच, त्यांच्या खिशातील एक हजार रुपये काढून घेतले. घटनेची माहिती मिळताच वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक गणेश जवादवाड, गुंडाविरोधी पथकाचे सहायक निरीक्षक हरीश माने यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. अवघ्या काही तासातच सर्व आरोपींना जेरबंद केले.
आरोपींनी हातातील कोयते हवेत फिरवून आरडाओरडा करत परिसरात दहशत पसरवली. यातील रोहन उर्फ गंग्या या सराईत गुन्हेगारावर दहा गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी गंग्यावर तडीपार, स्थानबद्धतेची कारवाईदेखील केली आहे. तसेच, आरोपी असद गोलंदाज आणि समाधान परिहार यांच्यावर प्रत्येकी दोन गुन्हे दाखल आहेत.