विद्येच्या माहेरघरात भरले ‘अघोरी’ वर्ग!
लक्ष्मण मोरे
मालमत्तेच्या वादामधून अगदी जवळच्याच नातेवाईकांनी जादूटोणा करीत करणी करण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी टाचण्या टोचलेले लिंबू, कोणत्यातरी प्राण्याचे काळीज, मटन, हळद-कुंकू, अगरबत्ती, ज्याच्यावर करणी करायची आहे, त्यांची साडी, फोटो आदी साहित्य ठेवून अघोरी जादूटोणा करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी चतु:शृंगी पोलीस ठाण्यामध्ये सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार ११ ऑगस्ट २०२३ आणि १३ ऑगस्ट २०२३ रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास कोथरूड येथील गणंजय सोसायटी आणि जनवाडी येथील सोमेश्वर मंदिराच्या पाठीमागे घडला.
याप्रकरणी अनिकेत विनोद सुपेकर (वय २८, रा. अखिल जनवाडी मित्र मंडळाजवळ, जनवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून कांता सुरेश चव्हाण (वय ७०), गिरीश सुरेश चव्हाण (वय ३५, दोघेही रा. जनवाडी), संगीता सुपेकर (वय ४५), स्वप्निल सुपेकर (वय २३), सोनल प्रवीण सुपेकर (वय ३०) आणि स्वप्निल भोकरे (वय ३५, रा. कोथरूड) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. यातील गिरीश चव्हाण, स्वप्निल सुपेकर आणि देवऋषी स्वप्निल भोकरे या तिघांना अटक करण्यात आली आहे. त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. चतुशृंगी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) जगन्नाथ जानकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी कांता चव्हाण ही फिर्यादी अनिकेत यांची आजी आहे. गिरीश हा त्यांचा मामा आहे. संगीता ही त्यांची सावत्र आई असून स्वप्निल हा भाऊ आणि सोनल सुपेकर ही चुलत बहिण आहे.
आरोपी आणि फिर्यादी हे एकाच समाजाचे आहेत. समाजातील पूजा पाठ करणे हा त्यांचा व्यवसाय आहे. फिर्यादी अनिकेत सुपेकर आणि आरोपींमध्ये गावाकडील जमीन, घर आणि पुण्यातील काही मालमत्तेसंदर्भात बऱ्याच वर्षांपासून वाद सुरू आहेत. ही मालमत्ता आपल्याला मिळावी याकरिता फिर्यादीवर वारंवार दबाव टाकण्यात येत होता. यासोबतच अनिकेतचा त्यांच्याच वस्तीत राहणारा मित्र कृष्णा चांदणे याने तात्कालिक कारणावरून गिरीश चव्हाण याला मारहाण केली होती. त्याचाही राग आरोपींच्या मनात होता. या सर्व आरोपींनी अनिकेत यांच्या आईची साडी घरामधून चोरली. अनिकेत, त्याची आई आणि नातेवाईकांवर करणी करण्याचा कट रचला. फिर्यादी अनिकेत यांच्या आईची साडी तसेच मावशी अनिता चव्हाण, काकू आशा सुपेकर आणि कृष्णा चांदणे यांचे फोटो देखील मिळवले. हे सर्व फोटो आणि त्यांच्या आईची चोरलेली साडी एकत्र करून त्यावर अघोरी जादू करण्यास सुरुवात केली.
या सर्व साहित्याच्या बाजूला अंडी ठेवण्यात आली. टाचण्या लावलेले लिंबू आणि त्या ठिकाणी शिजवलेला भात देखील ठेवण्यात आलेला होता. यासोबतच या ठिकाणी कोणत्यातरी प्राण्याचे काळीज, मटन, त्यावर हळदीकुंकू आणि अगरबत्ती ठेवण्यात आले. याठिकाणी काळा जादूटोणा करण्यास सुरुवात केली होती. याच काळात अनिकेत यांना आरोपी कसलीतरी पूजा करीत असल्याची माहिती मिळाली होती. म्हणून ते त्या ठिकाणी पूजापाठ पाहण्यासाठी गेले. त्यावेळी त्यांना या ठिकाणी त्यांच्या आईची साडी असल्याचे लक्षात आले. तोपर्यंत त्यांना आपल्या विरोधातच करणी-कवटाळ करण्याचे काम सुरू असल्याची कोणतीही कल्पना नव्हती. एकूणच सर्व प्रकार संशयास्पद वाटल्यामुळे त्यांनी मोबाईलमध्ये चित्रीकरण करण्यास सुरुवात केली.
यासंदर्भात त्यांनी पोलिसांकडे तक्रार अर्ज दाखल केला होता. चतुशृंगी पोलिसांनी या अर्जाचा तपास केला. दरम्यान, सरकारी वकिलांकडून याबाबत अहवाल घेतला. त्यानंतर पोलिसांनी संबंधितांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यातील तिघा जणांना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.