संग्रहित छायाचित्र
बापलेकाचे भांडणे सोडवायला गेलेल्या पोलीस अंमलदारावर चाकूचे वार करून त्यांना जखमी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बिबवेवाडी येथील अप्पर इंदिरानगर परिसरात पितापुत्राचे जोरदार कड्याक्याचे भांडण सुरु होते. ते भांडण सोडवण्यासाठी पोलीस अंमलदार गेले असता त्यांच्यावर चाकूने वार करून त्यांना गंभीर जखमी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार राहुल कोठावळे यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी चाकूचा वार करणाऱ्या उत्तम वसंत सोळुंके (वय ५६) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अप्पर इंदिरानगर येथील सुवर्णयुग मित्र मंडळाच्या मागे सार्वजनिक रस्त्यावर सोमवारी (दि. २८) रात्री सव्वाअकराच्या सुमारास पितापुत्रांमध्ये कडाक्याचे भांडण सुरु होते. संतापाने बेभान होऊन दोघेही एकमेकांच्या अंगावर धावून जात होते. फिर्यादी पोलीस अंमलदार गस्त घालत असताना त्यांना याची माहिती मिळाली. एक मद्यधूंद व्यक्तीमोठमोठ्याने आरडाओरडा करत रस्त्यावरील गाड्या फोडण्याचा प्रयत्न करत आहे, अशी माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले.
फिर्यादी घटनास्थळावर गेले असता त्याठिकाणी भांडण सुरूच होते. फिर्यादी कोठावळे मध्यस्थी करत वाद मिटवू लागले. त्यावेळी ‘‘तुम्ही आमच्यामध्ये येऊ नका. मध्ये आलात तर तुम्हाला खूप भारी पडेल,’’ असे म्हणत आरोपीने फिर्यादीवर चाकूने वार केला. यामध्ये फिर्यादी कोठावळे यांच्या डाव्या तळहातावर जखम झाली आहे. त्यावर ससून रुग्णालयात त्यांनी उपचार करण्यात आले. कोठावळे यांच्या हातावर सहा टाके घालून जखमेवर उपचार केले असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात विविध कलमांनुसार पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. आरोपी उत्तम सोळुंके याला फौजदारी प्रक्रिया संहिता ४१ (अ ) (१) प्रमाणे नोटीस बजावण्यात आली आहे, अशी माहिती बिबवेवाडी पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक सविता ढमढेरे यांनी ‘सीविक मिरर’शी बोलताना दिली.