Teacher Molestation : शिक्षकाने केला शाळेतील तीन विद्यार्थिनींचा विनयभंग; मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापनाकडून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न

पुर्व हवेलीमधील एका गावातील माध्यमिक शाळेत एका शिक्षकाने आपल्याच शाळेतील तब्बल तीन विद्यार्थिनींचा विनयभंग (Molestation) केल्याचा धक्कादायक घडला आहे.

Teacher Molestation

शिक्षकाने केला शाळेतील तीन विद्यार्थिनींचा विनयभंग

तुळशीराम घुसाळकर 

लोणी काळभोर : (Lono Kalbhor) पुर्व हवेलीमधील एका गावातील माध्यमिक शाळेत एका शिक्षकाने आपल्याच शाळेतील तब्बल तीन विद्यार्थिनींचा विनयभंग (Molestation) केल्याचा धक्कादायक घडला आहे. ही बाब मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापणाला असतानाही अद्याप संबंधित शिक्षकाच्या विरोधात कोणत्याही प्रकारची कारवाई केली नसल्याची गंभीर बाब पुढे आली आहे. 

या शिक्षकाने यापूर्वी पुरंदर तालुक्यातील एका माध्यमिक शाळेतही अशाच प्रकारे एका पंधरा वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग केला होता. त्यावेळी पोलिसांत तक्रार करण्याऐवजी संबंधित शिक्षकाला शिक्षा म्हणून त्याची बदली पुर्व हवेलीमधील शाळेत केली होती. मात्र या शाळेतही शिक्षकाने तीन मुलींशी अश्लिल कृत्य केले. दोन तालुक्यातील दोन विविध शाळांच्या चारहून अधिक मुलींचा विनयभंग केल्यानंतरही या शिक्षकांच्या विरोधात शिक्षण संस्थेकडुन गुन्हा दाखल होत नसेल, तर पोलिसांनी या प्रकरणात स्वतःहून लक्ष घालावे, अशी मागणी सदर शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी केली आहे. 

गावातील शाळेतील एका शिक्षकाने दिवाळीच्या सुट्टीपुर्वी एका पंधरा वर्षीय मुलीचा विनयभंग केला होता. त्यामुळे शिक्षकी पेशाला काळीमा फासणाऱ्या ५६ वर्षीय शिक्षकाच्या विरोधात पुर्व हवेलीत संतप्त वातावरण तयार झाले आहे.  एक महिन्यांपूर्वी या विकृत  शिक्षकाने आपल्याच शाळेतील तब्बल तीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची माहिती पुढे आल्याने नागरिक आणि पालकांमध्ये मोठ्या असंतोष पसरला आहे. या शिक्षकाने  तीन शालेय विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याची माहिती शाळा व्यवस्थापनाला मिळाली असल्याची कबुली त्यांनी दिली आहे. 

मात्र, शाळा व्यवस्थापनाने शाळेचे नाव बदनाम होऊ नये व संबंधित शिक्षकाच्या वयाचा विचार करुन त्याच्या विरोधात अद्याप कायदेशीर पाऊल उचलले नाही. या शिक्षकाच्या पुरंदर तालुक्यातील शाळेत घडलेल्या प्रकरणातच शाळेने कायदेशीर कारवाई केली असती तर पुर्व हवेलीमधील वरील शाळेत वरील प्रकार घडलाच नसता, अशी प्रतिक्रिया पालकांकडून  व्यक्त होत आहे. 

अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे जिल्हा कोषाध्यक्ष राघवदास चौधरी म्हणाले एका विकृत शिक्षकाकडुन दोन वर्षाच्या काळात दोन वेगवेगळ्या शाळांमध्ये चारहून अधिक शालेय मुलींचा विनयभंग होतो. तसेच ही घटना दडपली जात आहे, हि बाब गंभीर व चिड आणणारी आहे. या प्रकरणातील माथेफिरु नराधाम शिक्षक व त्याचे कृत्य दडपणारे शाळेचे मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन या सर्वांवर पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची गरज आहे. संबंधित शिक्षकाला सक्तीच्या रजेवर पाठवणे अथवा त्याची बदली दुसऱ्या शाळेत करणे ही बाब अतिशय चिड आणणारी आहे. याबाबत आमच्या संघटनेचे कार्यकर्ते पुणे शहर पोलीस आयुक्त यांची भेट घेऊन, या नराधाम शिक्षक, शाळेचे मुख्याध्यापक आणि शाळा व्यवस्थापन यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करणार आहोत. या प्रकरणात पालक तक्रार देत नसतील, तर शाळेच्या मुख्याध्यापकांनी तक्रार देण्याची गरज आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest