हिंदी 'वेब सीरिज'मध्ये काम देण्याच्या बहाण्याने मराठी अभिनेत्रीला गंडवले
'वेब सीरिज' मध्ये काम देण्याच्या बहाण्याने मराठी अभिनेत्रीला हजारो रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. 'बारिश' नावाच्या वेब सीरिजमध्ये काम मिळण्याकरिता ऑडिशन देण्यासाठी विमान तिकीट आरक्षित करायला लावत ही फसवणूक करण्यात आली. हा प्रकार ८ सप्टेंबरपासून आजवर ऑनलाईन पद्धतीने घडला. या प्रकरणी पर्वती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी तीन अज्ञात मोबाईल फोनधारक आणि गुगल अकाऊंट धारकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी अभिनेत्री गौरी रोहित डबीर (वय ४८, रा. रोहन कृतिका, सिंहगड रस्ता) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, फिर्यादी कुटुंबासह राहात असून त्या अभिनय क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांना ८ सप्टेंबर रोजी स्ट्रिक्टली ऑडिशन्स ओन्ली या व्हॉट्सॲप गृपवर अनोळखी मोबाईल क्रमांकावरून 'बारिश' नावाच्या वेब सीरिजसाठी ४५ ते ५० वयाच्या महिला कलाकारांची गरज आहे.' असा मेसेज आला होता. त्या व्हॉट्सॲप मेसेजवर त्यांनी पात्रांकरिता इच्छुक असल्याचा मेसेज केला. त्यानंतर त्यांना दीपक नावाच्या व्यक्तीने फोन केला. त्याने 'बारिश' नावाच्या हिंदी सीरियलचा कास्टिंग डायरेक्टर असल्याचे सांगितले. ही सीरियल 'झी तेलगु' चॅनलवर प्रसारित होणार असल्याचेही सांगितले. याचे चित्रीकरण हैद्राबाद येथे ४२ दिवस होणार असल्याची बतावणी करीत त्यांचे फोटो, ऑडिशन व्हीडीओ, व इतर माहिती पाठविण्यास सांगितले. त्याप्रमाणे त्यांनी ही माहिती ताबडतोब पाठवली. त्यानंतर तीन दिवसांनी दीपक याने त्यांना व्हॉट्सॲपवर 'क्या हैद्राबाद शुट कर सकते है?' असा मेसेज पाठवून सीरियलमधील त्यांचे पात्र (रोल), प्रॉडक्शनचे डिटेल्स व शूटिंग शेड्यूल याची सविस्तर माहिती पाठविली. हे चित्रीकरण २९ सप्टेंबरपासून सुरू होणार असल्याचा मेसेज केला. परंतु फिर्यादी गौरी यांना ३० सप्टेंबर रोजी मीटिंग असल्याने त्यांनी १ ऑक्टोबरपासून शूटिंगकरीता जॉईन होईन असे कळवले होते.
त्याने व्हॉट्सॲपवर मेसेज करून 'आपको मॉर्निंग मे सब डिटेल्स देता हू.' असे कळवले. त्यानंतर दोन दिवसांनी पुन्हा काम झाल्याचे सांगितले. त्यानंतर फोन करून ॲग्रिमेंटकरिता दोन दिवसात हैद्राबाद येथे जावे लागेल. त्याबाबत एक्झिक्युटिव्ह प्रोड्यूसरचा फोन येईल असे सांगितले. दुसऱ्या दिवशी त्यांना एका अनोळखी व्यक्तीने फोन करून एक्झिक्युटिव्ह प्रोड्यूसर बोलत असल्याची बतावणी केली. ॲग्रिमेंटकरिता हैद्राबाद येथे यावे लागेल. त्याकरिता हैद्राबाद ते पुणे इंडिगो कंपनीचे तिकीट बुक करा. इंडिगो आमचे ट्रॅव्हल्स पार्टनर आहेत. त्याकरिता आमचा प्रोमोकोड एकेकेजी ९८ वापरा असे सांगितले. त्यानंतर हैदराबाद येथील एक पत्तादेखील मेसेज केला. त्यानुसार गौरी यांनी इंडिगोची फ्लाईट बुक करण्यास सुरुवात केली. बुकिंग करताना एकेकेजी ९८ हा प्रोमोकोड टाकला . त्यावेळी तो चुकीचा असल्याचे दर्शविण्यात आले. त्याचा स्क्रिनशॉट त्या व्यक्तीला व्हॉट्सॲपवर पाठविण्यात आला. त्यावर त्याने फोन करून 'तुम्ही फ्लाईट बुक करण्याकरिता उशीर केल्यामुळे तो कोड इन व्हॅलिड झाला. त्यामुळे आता तुम्हाला आमचे ट्रॅव्हल पार्टनर कडून बुकिंग करावे लागेल' असे सांगून बुकिंगसाठी इंटरग्लोब एव्हीएशन लिमिटेडच्या एका बँक खात्याची (Interglobe Aviation limited) माहिती पाठविली. परंतु, गौरी नेटबँकिंग वापरत नसल्याने त्यांना ट्रॅव्हल पार्टनरचा मोबाईल नंबर पाठविण्यात आला.
त्यावर संपर्क साधल्यावर त्या व्यक्तीने गुगल पे क्रमांक पाठविला. त्यावर गौरी यांनी १६ हजार ५६० रुपयांचे पेमेंट केले. पैसे पाठवित असताना त्यावर इंटरग्लोब एव्हीएशन लिमिटेड असे नाव येत होते. परंतु, त्याचा यूपीआय आयडी विशालराव गांधी - ५ @ ओकेएचडीएफसी बँक या नावाने येत होता. त्यांनी ट्रान्झेक्शनचा स्क्रिनशॉट काढून तो आरोपींच्या दोन व्हॉट्सॲप नंबरवर पाठविला. त्यांना फोन केल्यानंतर त्यांनी ईमेल आयडी घेतला. त्यावर तिकीट पाठवितो असे सांगितले. परंतु, त्यांना तिकीट मिळाले नाही. त्यामुळे आरोपींना फोन केल्यानंतर त्यांनी गौरी यांचे फोन उचलले नाहीत. तसेच कोणताही रिप्लाय दिला नाही. त्यावेळी त्यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यांचा विश्वास संपादन करून हिंदी सीरियलमध्ये काम देतो असे सांगत हैद्राबाद येथे येण्याचे तिकीट बुक करण्याच्या बहाण्याने ऑनलाईन १६ हजार ५६० रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे करीत आहेत.