संग्रहित छायाचित्र
पुणे : शहरात घरफोडीच्या घटनांचे सत्र सुरु आहे. चोरट्यांना पकडण्याची मोहिम पोलिसांनी आखली आहे. दाखल गुन्ह्यातील शहराच्या वेगवेगळ्या भागात घरफोडी करणाऱ्या सराइत चोरट्याला गुन्हे शाखेच्या दरोडा आणि वाहनचोरी विरोधी पथकाने अटक केली. तपासात त्याच्यावरील घरफोडीचे चार गुन्हे उघडकीस आले आहेत.
तौसिफ बशीर शेख (वय २५, रा. कासेवाडी, भवानी पेठ) असे अटक करण्यात आलेल्या सराइत चोरट्याचे नाव आहे. शेखच्या तपासणीत कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडीचे तीन, तसेच सिंहगड रस्ता परिसरात एक गु्न्हा केल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेचे दरोडा आणि वाहनचोरी विरोधी पथक गस्त घालत होते. त्यावेळी घरफोडीच्या गुन्ह्यात पसार असलेला चोरटा शेख कासेवाडी भागात थांबल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण काळुखे, रवींद्र लोखंडे यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने सापळा लावून आरोपी शेखला अटक केली. त्याची कसून चौकशी केली असता, घरफोडीचे चार गुन्हे केल्याचे कबूल केले. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील सराइतांची झाडाझडती घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे. फरार आरोपी, तसेच बेकायदा शस्त्र बाळगणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात येत आहे. पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक आयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नंदकुमार बिडवई, सहायक निरीक्षक प्रवीण काळुखे, उपनिरीक्षक शाहीद शेख, बाळू गायकवाड, प्रदीप राठोड, धनंजय ताजणे, इरफान पठाण, साईकुमार कारके यांनी ही कारवाई केली.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.