संग्रहित छायाचित्र
वानवडी येथील भैरवनाथ मंदिरात रात्रीच्या (Bhairavanath temple) अंधाराचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी (Theft)घुसखोरी करत मंदिराची दानपेटी फोडून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune crime) ही घटना शनिवारी (दि. १४) घडली. यात चोरट्यांनी मंदिरातील पूजेसाठीच्या असलेल्या धातूच्या वस्तूंचीही चोरी केली आहे. तेथे देवाचे चांदीचे मुकूटही होते. मात्र ते कपाटात कपड्यामध्ये गुंडाळून ठेवलेले असल्याने चोरट्यांना ते दिसले नाही. यामुळे हे चोरी जाण्यापासून वाचले. या प्रकरणी मंदिराचे खजिनदार माजी मंत्री चंद्रकांत उर्फ बाळासाहेब विठ्ठलराव शिवरकर यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
वानवडी पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार सचिन घोडके या प्रकरणाचा तपास करीत आहेत. त्यांनी ‘सीविक मिरर’ शी बोलताना सांगितले की, ‘‘वानवडी येथील एम्प्रेस गार्डनकडून सोलापूर महामार्गाकडे जाताना डाव्या बाजूला हे भैरवनाथ मंदिर आहे. त्याच्याजवळ भैरवनाथ विद्यालय असून बाजूला सेंट पॅट्रिक मैदान आहे. मंदिराच्या मागील बाजूस भैरोबा नाला आहे. रात्री अंधाराचा फायदा घेऊन चोरटे मैदानाच्या सीमा भिंतीवरून उडी मारून आले असावेत. मंदिरात घुसून त्यांनी चोरी केली. चोरी करण्याच्या पद्धतीवरून ते भुरटे असण्याची शक्यता वाटते.’’
मंदिराच्या समोर मंदिरातील साहित्य ठेवण्यासाठी एक भांडार आहे. त्यात मंदिराचे साहित्य ठेवलेले असते. तसेच मंदिराच्या समोर दानपेटी आहे. रात्री १० नंतर येथे कोणीच नसते. शनिवारी रात्री मंदिरात कोणी नसताना भुरटे चोर मंदिरात घुसले. त्यांनी दानपेटी फोडत त्यातील रोकड चोरून नेली. शिवाय भांडारात घुसून त्यातून पूजेचे धातूचे साहित्य पळवले. रविवारी सकाळी सहाच्या दरम्यान पुजारी आले असता त्यांना मंदिरातील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले आढळून आले. दानपेटी फोडण्यात आल्याचे पाहून चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. मंदिरातील धातूची समई, तांब्या- पितळेची भांडी, दानपेटीतील रोख रक्कम चोरट्यांनी चोरून नेली.
चोरी झाल्याचे समजताच मंदिराचे खजिनदार बाळासाहेब शिवरकर यांनी वानवडी पोलीस ठाण्यात धाव घेत चोरीची तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चोरट्यांचे ठसे शोधले. मंदिरात असलेले सीसीटीव्ही कॅमेरे मागील दोन महिन्यांपासून बंद पडले आहेत. त्यामुळे मंदिराच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही चोरी कैद होऊ शकली नाही. पुढील तपास सुरू असून लवकरात लवकर या भुरट्या चोरट्याला पकडण्यात येईल, असे वानवडी पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार सचिन घोडके यांनी सांगितले.