संग्रहित छायाचित्र
शेअर बाजारात ‘ट्रेडिंग’ व ‘आयपीओ’ खरेदी करण्यासाठी भाग पाडून महिलेला ३५ लाख ६० हजार रुपयांना गंडा घातल्याप्रकरणी आरोपीचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला. सत्र न्यायाधीश एस. आर. नरावडे यांनी हा आदेश दिला.
सलमान मन्शूर शेख (वय २३, रा. इंदिरानगर, लोहगाव रोड) असे जामीन फेटाळलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह एकूण सात जणांवर हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. याबाबत पाषाण येथील महिलेने तक्रार दिली आहे.
‘व्हॉट्सअप ग्रुप’च्या ‘अॅडमिन’ने शेअर बाजारात ‘ट्रेडिंग’ व ‘आयपीओ’ खरेदीतून आकर्षक परतावा देण्याचे आमिष तक्रारदार महिलेला दाखविले होते. त्यावर विश्वास ठेवत महिलेने ३१ लाख ६० हजार रुपये गुंतविले. त्याचा परतावा मिळण्यासाठी ‘चॅरिटी’ म्हणून चार लाख रुपये देणगी देण्यास सांगितले. त्यानंतरही परतावा न मिळाल्याने महिलेने पोलिसांकडे धाव घेतली. त्यानंतर आरोपी सलमानला अटक करण्यात आली. सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपी सलमानने जामीनासाठी अर्ज केला. त्याला अतिरिक्त सरकारी वकील संजय पवार यांनी विरोध केला. आरोपीने स्वत:च्या बँक खात्यावर फसवणुकीच्या रकमेतील चौदा लाख रुपये घेऊन ते दुसऱ्या आरोपीला दिले. त्याबदल्यात त्याने २५ हजार रुपये स्वीकारले आहेत. आरोपीने त्याचे वडिलांसह अन्य व्यक्तींच्याही बँक खात्यावर पैसे स्वीकारले आहेत. त्यामुळे त्याचा जामीन अर्ज फेटाळण्यात यावा, असा युक्तिवाद सरकारी वकीलांनी केला. तो ग्राह्य धरत न्यायालयाने आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला.