Lalit Patil Drug Case : न्यायालयाने पोलीसांची केली कानउघडणी! ललित पाटील नीट सांभाळू शकले नाही; आता भूषण आणि अभिषेकची पोलीस कोठडी कशासाठी

ललित पाटील ड्रग्ज तस्करी प्रकरणाचे पडसाद बुधवारी (दि. ११) पुणे जिल्हा सत्र न्यायालयातही उमटल्याचे पाहायला मिळाले. आरोपी पोलिसांच्या तावडीमधून पळून जाण्याच्या घटनेची न्यायालयाने गंभीर दाखल घेत ताशेरे ओढले.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Amol Warankar
  • Thu, 12 Oct 2023
  • 10:05 am
Lalit Patil Drug Case

प्रतिष्ठा पणाला लागल्याने पोलीस कोठडी?

न्यायालयाचा तपास अधिकाऱ्यांना ताशेरेयुक्त सवाल, आरोपींचे देशभरातील ड्रग्ज तस्करांशी संबंध

लक्ष्मण मोरे

ललित पाटील ड्रग्ज तस्करी प्रकरणाचे(Lalit Patil Drug Case) पडसाद बुधवारी (दि. ११) पुणे जिल्हा सत्र न्यायालयातही (Pune District Sessions Court)उमटल्याचे पाहायला मिळाले. आरोपी पोलिसांच्या तावडीमधून (Pune Police) पळून जाण्याच्या घटनेची न्यायालयाने गंभीर दाखल घेत ताशेरे ओढले.  पोलीस खात्याचीच प्रतिष्ठा पणाला लागल्यामुळे आरोपींच्या पोलीस कोठडीची मागणी करताय की काय, असा ताशेरेयुक्त सवाल न्यायालयाने पोलिसांना केला.

पोलिसांनी अटक केलेल्या भूषण पाटील (Bhushan Patil) आणि अभिषेक बालवडकर (Abishek Balwadkar) यांना बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. पोलिसांनी आरोपीच्या पोलीस कोठडीची (Police custody) मागणी केली. त्यावर, संतापलेल्या न्यायालयाने तपास अधिकाऱ्यांची कानउघडणी केली. ‘‘कोटींवधी रुपयांच्या ड्रग्ज तस्करी प्रकरणातील आरोपी ललित पाटील याला पोलीस ताब्यात असतानाही नीट सांभाळू शकले नाहीत. आता भूषण पाटील आणि अभिषेक बालवडकर या दोघांची पोलीस कोठडी कशासाठी मागताय? त्यांच्याकडे कसला तपास करणार आहात? पोलीस खात्याचीच प्रतिष्ठा पणाला लागल्यामुळे कोठडीची मागणी करताय की काय,’’ असा संतप्त सवाल प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. सी. बिराजदार यांच्या न्यायालयाने केला.

पोलिसांनी या गुन्ह्याशी संबंधित माहिती, पुरावे असलेली फाईल तसेच केस डायरी न्यायालयात सादर केली होती. यामधील कागदपत्रांची मांडणी व्यवस्थित नसल्याने न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयाकडे माफी आर्जव करीत पुढील वेळी योग्य काळजी घेऊन कागदपत्र सादर करण्याची हमी दिली. दरम्यान पोलिसांनी आरोपींना १४ दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी केली. त्यावर न्यायालयाने ‘‘आरोपींना १४ दिवसांची कोठडी दिल्यानंतर ललित पाटील पकडला गेला तर एकत्र तपास कसा करणार? त्यावेळी मात्र पुन्हा भूषण आणि अभिषेक याच्या पोलीस कोठडी देता येणार नाही. त्यामुळे एकाच वेळी १४ दिवसांची कोठडी घेणे योग्य होणार नाही,’’ असे स्पष्ट केले.

पोलिसांनी अटक केलेले भूषण आणि अभिषेक यांच्याकडून बाजू मांडण्यासाठी वकील नियुक्त करण्यात आलेले नव्हते. त्यामुळे त्यांना जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत वकील पुरविण्यात आले. ॲड. चैतन्य दीक्षित आणि ॲड. यशपाल पुरोहित यांनी आरोपींच्या वतीने युक्तिवाद केला. मेफेड्रॉन हा अमली पदार्थ तयार करण्यासाठी आवश्‍यक असलेला कच्चा माल आरोपींना कोणामार्फत पुरविण्यात येत होता? तसेच आरोपींनी गुन्ह्यात वापरलेली वाहने जप्त करायची असल्याने आरोपींना १४ दिवसांची कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील नीलम यादव-इथापे यांनी केली. मात्र न्यायालयाने आरोपींना पाच दिवसांची म्हणजे १६ ऑक्टोबरपर्यंतच पोलीस कोठडी सुनावली.

 ‘‘अपुऱ्या पुराव्याच्या आधारे आरोपींना अटक करण्यात आली आहे.  आरोपींचा या गुन्ह्यात थेट सहभाग दिसून येत नाही. पोलिसांनी कोठडीची दिलेली कारणे ही ललित पाटीलशी संबंधित आहेत. पोलिसांनी केलेली कलमवाढ जामीनपात्र आहे,’’ असा युक्तिवाद   बचाव पक्षाकडून करण्यात आला. दरम्यान, ललित पाटील याला दोन कोटी रुपयांचे मेफेड्रोन देण्यासाठी आलेला साथीदार सुभाष मंडल आणि ससून रुग्णालयाच्या कॅन्टीनमधील कर्मचारी रौफ रहीम शेख यांची यापूर्वीच न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.  या गुन्ह्याचा तपास अमली पदार्थ विरोधी पथक दोनचे पोलिस निरीक्षक सुनील थोपटे करीत आहेत.

ससून रुग्णालयातून पसार झालेला ललित पाटील, त्याचा मोठा भाऊ भूषण पाटील, साथीदार अभिषेक बलकवडे हे मेफेड्रॉनची विल्हेवाट लावण्यासाठी महाराष्ट्र आणि इतर राज्यात वास्तव्य करून रहात होते. देशभरातील अनेक तस्करांच्या हे सर्वजण संपर्कात होते, अशी माहिती पोलिसांनी न्यायालयाला दिली. आरोपींनी त्यांच्या मोबार्इलमधील डेटा फॉरमॅट केला आहे. हा डेटा सायबर तज्ज्ञांकडून रिकव्हर करण्यात येत आहे. आरोपींनी अमली पदार्थांच्या विक्रीतून किती स्थावर आणि जंगम मालमत्ता जमा केली आहे, याचा पोलीस तपास करीत आहेत.

आरोपींचे आंतरराष्ट्रीय रॅकेट?

ससून रुग्णालयाच्या  कॅन्टीनमधील कामगार रौफ शेख याच्यामार्फत पुरविण्यात आलेले दोन कोटी १४ लाख रुपयांचे मेफेड्रोन जप्त करण्यात आले होते. ते ससूनमध्ये पोचविण्यापूर्वी  भूषण आणि अभिषेक यांनी ललितचा साथीदार सुभाष मंडल याला त्याचा नमुना दिला होता. त्याचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना तपासात मिळाले आहे. त्यामुळे अंमल पदार्थ विक्री करणाऱ्यांची साखळी निष्पन्न झाली आहे. आरोपींचे मेफेड्रॉन उत्पादन, विपणन आणि विक्रीचे मोठे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय रॅकेट असण्याची दाट शक्यता आहे. त्याबाबत तपास करण्यात येत आहे, असे पोलिसांनी न्यायालयास सांगितले. 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest