Bihari Jamtara Gang : 'बिहारी जमतारा' टोळी अखेर गजाआड; पोलिसांनी जिवावर उदार होत केली कारवाई

पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाच्या नावाने त्यांच्याच अकाऊंट विभागाच्या व्हॉईस प्रेसिडेंटला फोन करून तत्काळ पैसे ट्रान्सफर करायला सांगत ६६ लाखांना गंडविणाऱ्या बिहारी टोळीमधील दोघाजणांना सायबर पोलिसांनी गजाआड केले आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Amol Warankar
  • Fri, 13 Oct 2023
  • 02:58 pm
Bihari Jamtara Gang

'बिहारी जमतारा' टोळी अखेर गजाआड

सायबर गुन्ह्यांमध्ये पहिल्यांदाच आढळली शस्त्रात्रे

लक्ष्मण मोरे
पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाच्या नावाने त्यांच्याच अकाऊंट विभागाच्या व्हॉईस प्रेसिडेंटला फोन करून तत्काळ पैसे ट्रान्सफर करायला सांगत ६६ लाखांना गंडविणाऱ्या बिहारी टोळीमधील दोघाजणांना (Bihari Jamtara Gang) सायबर पोलिसांनी (Cyber ​​police) गजाआड केले आहे. या दोघांकडून तब्बल ३६ सीमकार्ड, विविध बँकांचे १९ एटीएम कार्ड, दोन धनादेश पुस्तके, एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि सहा जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. सायबर पोलिसांनी बिहारमधील सिवान जिल्ह्यातील इजमायली नावाच्या गावात जाऊन ही कारवाई केली. पोलिसांनी अक्षरक्ष: 'फिल्मी स्टाईल' कारवाई करीत आरोपींना अटक केली. आजवर झालेल्या सायबर गुन्ह्यांसंबंधी कारवायांमध्ये पहिल्यांदाच 'वेपन' पकडण्यात आले आहे. या आरोपींनी पुण्यातील आणखी एका बिल्डरला ४० लाखांना गंडवल्याचे समोर आले आहे. 

बेलाल शाबीर अन्सारी (वय २१) आणि कामरान इम्तियाज अन्सारी (वय २३, दोघेही रा. इजमायली, सिवान, बिहार) अशी आरोपींची नावे आहेत. या आरोपींचे शिक्षण दहावी-बारावीपर्यंतच झालेले असून सायबर फ्रॉड करण्यात ते अत्यंत निष्णात आहेत. या प्रकरणी यापूर्वी बिशल कुमार नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली होती. या आरोपींवर गोपाळगंज पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या संदर्भात पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, वरिष्ठ निरीक्षक मीनल सुपे-पाटील, चंद्रशेखर सावंत यांनी माहिती दिली. बांधकाम व्यावसायिकाच्या अकाऊंट विभागाच्या व्हॉईस प्रेसिडेंटने सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. ते पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाच्या कंपनीत अकाऊंट विभागाच्या व्हाईस प्रेसिडेंट पदावर काम करतात. त्यांना मे महिन्यात आरोपींनी व्हॅाट्स ॲपवर फोन केला होता. त्यावेळी त्यांनी 'मी संचालक बोलत असून माझ्या पर्सनल नंबरवरून फोन केला आहे. हा नंबर कोणालाही देऊ नका. मी मेसेज पाठवला आहे. त्याप्रमाणे पैसे पाठवा.' असे सांगितले. फिर्यादीने कोणतीही खातरजमा न करता व्हाॅट्स ॲपवर आलेल्या मेसेजप्रमाणे जमालुद्दीन शेख याच्या खात्यावर ९ लाख ८० हजार रुपये पाठवले. त्यानंतर, बाबई दास याच्या खात्यावर ३५ लाख ९० हजार ६०८ रुपये पाठवले, तर टंकेश्वर बोरा याच्या खात्यावर २० लाख ७० हजार ४०८ रुपये ऑनलाईन पद्धतीने वर्ग केले. त्यानंतर संबंधित संचालकाकडे जाऊन आपण सांगितल्याप्रमाणे पैसे पाठविल्याचे सांगितले. त्यावर त्यांनी आपण पैसे पाठवायला सांगितलेच नसल्याचे सांगताच फसवणुकीचा प्रकार समोर आला. त्यांनी तत्काळ सायबर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. (The 'Bihari Jamtara' gang is finally arrest)

या प्रकरणी सायबर पोलिसांनी १८ मे रोजी गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यातील पैसे जमा झालेल्या बिशल कुमार (रा. लखडी दरगाह, सिवान, बिहार) याला सिवानमध्ये जाऊन अटक करण्यात आली होती. आरोपींनी गुन्हा करताना वापरलेले मोबाईल क्रमांक, ईमेल आयडी व पेमेंट करण्यासाठी दिलेल्या लिंकचा व वेगवेगळ्या बँक खात्यांचा पोलिसांनी तांत्रिक तपास केला. तसेच, पैसे काढण्यासाठी वापरलेल्या  बिहारमधील एटीएम सेंटरच्या सीसीटीव्हीच्या आधारे त्यांचा ठावठिकाणा शोधला. आरोपी सिवान जिल्ह्यातील इजमाली गावात असल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाले. त्याप्रमाणे सिवान येथे पुणे सायबर पोलीस ठाण्याचे पथक रवाना झाले. बेलाल शाबीर अन्सारी आणि कामरान इम्तियाज अन्सारी या दोघांचा शोध घेऊन त्यांना अटक केली. सिवानमधील अतिरिक्त मुख्य न्यायालयाच्या परवानगीने त्यांना  पुण्यात आणण्यात आले. पुणे न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली. आरोपींच्या घेतलेल्या घर झडतीमध्ये विविध मोबाईल कंपन्यांचे ३६ सीम कार्ड, ८ मोबाईल फोन, विविध बँकांचे १९ एटीएम कार्ड, दोन धनादेश पुस्तके, १ देशी बनावटीचे पिस्तूल, ६ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. या आरोपींवर हैदराबाद आणि पंजाबमध्ये अशाच स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे.

या आरोपींनी पुण्यातील आणखी एका बिल्डरला अशाच प्रकारे ४० लाखांना फसविल्याचे समोर आले आहे. तसेच, हैदराबाद येथील जुबली हिल्स पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या २५ लाखांच्या फसवणुकीच्या गुन्ह्यातही त्यांच्या 'लिंक' मिळाल्या आहेत. उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक आयुक्त आर. एन. राजे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिनल सुपे-पाटील, पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद खरात, सहायक फौजदार संदेश कर्णे, पोलीस अंमलदार दत्तात्रय फुलसुंदर, अश्विन कुमकर, प्रविणसिंग राजपूत, वैभव माने, दिनेश मरकड, शिरीष गावडे, राजेश केदारी, योगेश व्हावळ यांच्या पथकाने कारवाई केली आहे.

आरोपी देशभरातील उद्योजकांना अशाप्रकारे लाखोंचा गंडा घालत आहे. ही रक्कम खात्यावर जमा झाल्यानंतर विविध खात्यांवर वर्ग केली जाते. मुख्य खाते पोलिसांकडून गोठविण्याची प्रक्रिया सुरू होईपर्यंत यातील बहुतांश रक्कम काढून घेण्यात आलेली असते. आरोपींच्या टोळ्या तीन प्रकारात काम करतात. पहिला असतो कॉलर... जो प्रत्यक्ष फोन करतो. पैसे काढण्याकरिता दुसरा माणूस ठेवलेला असतो, तर तिसरा माणूस या पैशांची विल्हेवाट लावतो. आरोपींनी आतापर्यन्त पुण्यातील दोन नामांकित बिल्डर, एक आर्किटेक्ट फर्म, एक सॉफ्टवेअर सोल्युशन्स कंपनी आणि आदर पूनावाला यांना कोट्यवधींचा गंडा घातला आहे.  

पोलिसांनी दाखविले धाडस

पोलीस जेव्हा आरोपींची माहिती घेत होते तेव्हा त्यांना आरोपी राहात असलेला भाग धोकादायक असल्याचे लक्षात आले. त्यांनी सुरुवातीला गावात जाऊन पोलिसांची मदत घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, स्थानिक पोलिसांनी या नावाची व्यक्ती गावात राहातच नसल्याचे सांगितले. पुणे पोलिसांनी याबाबत पूर्ण माहिती दिल्यानंतर त्यांच्यासोबत स्थानिक पोलीस पाटील प्रकारातील व्यक्ती दिली. जेव्हा पोलीस आरोपींच्या ठिकाणाच्या जवळ पोचले तेव्हा एक 'वॉच टॉवर' दिसला. त्यावरून आरोपी आपल्याला पकडण्यासाठी कोणी येत आहे किंवा कसे याची टेहळणी करतात. त्यांच्या ठिकाणाच्या भोवतीने उंच कंपाऊंड बांधण्यात आलेले होते. पोलिसांनी ओळख लपविण्यासाठी प्रवीण राजपूत आणि आश्विन कुमकर, वैभव माने आणि दत्तात्रय फुलसुंदर, दिनेश मरकड यांनी दाढी वाढवलेली होती. थ्री-फोर्थ पॅन्ट, टी-शर्ट घालून ते आरोपींच्या ठिकाणापर्यन्त पोचले. पोलीस उपनिरीक्षक प्रमोद खरात यांनी पळून जात असलेल्या आरोपींना छतावरून उडी मारून पकडले. वास्तविक आरोपींकडे अग्निशस्त्र होते. त्यांच्याकडून गोळीबार झाला असता तर मोठा अनर्थ घडण्याची शक्यता होती. तरी देखील पोलिसांनी धाडस दाखवीत आरोपींना जेरबंद केले.

कशी आहे 'मोडस ऑपरेंडी'

देशभरातील बड्या-मध्यम आणि छोट्या उद्योजकांचा डेटा असलेली माहिती अनेक संकेतस्थळावर (वेबसाईट) उपलब्ध आहे. या विविध संकेतस्थळांचा आरोपी खुबीने वापर करतात. त्यामधून संबंधित उद्योजकांचे मोबाईल क्रमांक, कंपनी प्रोफाईल, ईमेल आयडी आदी माहिती घेतली जाते. त्यांचे छायाचित्र 'डीपी'वर ठेवत नाव देखील उद्योजकांचे ठेवले जाते. त्या क्रमांकावरून संबंधित उद्योजकाच्या मॅनेजर, अकाऊंटटंट किंवा जबाबदार व्यक्तीला व्हाॅट्स ॲप कॉल केला जातो. त्यांना आपण महत्त्वाच्या मिटिंगमध्ये असून पाठविलेल्या मेसेजप्रमाणे पैसे पाठवा. हा माझा पर्सनल नंबर असून कोणालाही तो देऊ नका असे सांगितले जाते. डीपीवरील फोटो आणि नाव पाहून संबंधित व्यक्ती कोणतीही खातरजमा न करता पैसे ट्रान्सफर करून मोकळी होते. जेव्हा फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येतो तोपर्यंत लाखो रुपये गेलेले असतात. त्यानंतर मोबाईलमधील सीम कार्ड काढून ते नष्ट करून टाकतात. एकदा वापरलेले सीम कार्ड पुन्हा वापरले जात नाही.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest