चॉकलेट देण्याच्या बहाण्याने नऊ वर्षीय मुलीला बोलावून घेतल्यावर तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी (२९ सप्टेंबर) सकाळी परंदवाडी येथे उघडकीस आली. लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात २६ सप्टेंबरला गुन्हा दाखल करण्यात आला होता.
विजय शशिकांत मालपोटे (वय ३५, रा. उर्से, ता. मावळ) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. नऊ वर्षीय पिडीत मुलीच्या आईने लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात २६ सप्टेंबर रोजी फिर्याद दिली होती.
संशयित आरोपी विजय मालपोटे याने पिडीत मुलीला चॉकलेट देण्याच्या बहाण्याने बोलावून घेतले. त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर लोणावळा ग्रामीण पोलीस विजय याच्या मागावर होते.
दरम्यान, शुक्रवारी सकाळी परंदवाडी येथे झाडाला टॉवेलच्या सहायाने गळफास घेतलेल्या अवस्थेत विजय आढळून आला. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे तपासणीपूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. आत्महत्येबाबत शिरगाव (पिंपरी-चिंचवड) पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. शिरगाव पोलीस तपास करीत आहेत.