संग्रहित छायाचित्र
आईवडील आणि भावाने संपत्तीतील हिस्सा नाकारल्याने आणि बिकट आर्थिक परिस्थितीमुळे आलेल्या नैराश्यातून ३८ वर्षीय व्यक्तीने गळफास घेत आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. अभिजित मछिंद्र कदम असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव असून त्यांची पत्नी दिपाली यांनी शुक्रवार, २२ सप्टेंबर रोजी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी अभिजितचे आईवडील आणि भावावर गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी दिपाली (वय ३८ रा. तुषार पार्क आनंद रेसीडन्सी, धानोरी) या धानोरीत पती, मुलासह राहतात. मागील काही वर्षांपूर्वी त्यांचा अभिजितशी आंतरजातीय प्रेमविवाह झाला होता. लग्नाला अभिजीतच्या आईवडिलांचा विरोध असल्याने या दोघांना दुय्यमत्वाची वागणूक मिळत होती. फिर्यादीस सासू-सासऱ्यांनी एक वर्षानंतर घरात घेतले. मात्र दीपाली यांच्या आईवडिलांना घरी येण्यास बंदी केली. दरम्यान दिपाली यांना पुढील शिक्षणासाठी त्यांच्या वडिलांनी प्रवेश घेऊन दिला. या काळात त्या शिक्षणासोबत घरातील काम करत होत्या. मात्र सासू सासरे त्यांचा छळ करत होते. दीपाली यांना जातीवाचक बोलत होते. त्यांना शिक्षणाचे कारण देऊन गर्भपातही करायला लावला होता. या त्रासाला कंटाळून दीपाली आणि पतीने वेगळे राहण्याचा निर्णय घेतला. वेगळे राहतानाही सासू सासरे तुच्छतेचीच वागणूक देत होते.
अभिजीत यांची कृष्णा साई सव्हिसेस ही कंपनी होती. त्यातून मिळणार नफा सासरे मच्छिंद्र कदम घेत होते. मच्छिंद्र यांनी अभिजित यांच्या नावावर ८५ लाखाचे कर्ज काढले होते. त्याचे हप्ते थकल्याने बँकेने अभिजित यांच्या बँक खात्यामधील रक्कम वळती करुन बँक खाते सिल केले होते. अभिजित चालवत असलेल्या कंपनीतील कामगराचे पगार थकले. त्यामुळे ते तणावात होते. त्यांनी आईवडिलांकडे पैशांची मागणी केली असता वादावादी झाली आणि पैसे देण्यास नकार दिला.
या भांडणात वेगळे राहण्यासाठी फ्लॅट घेण्यासाठीही पैसे शिल्लक राहिले नाही. कुटुंबीयांनी मात्र पैसे देण्यास ठाम नकार दिला. आधीचे कर्ज वेळेवर चुकते केले नसल्याने त्यांना कर्जही मिळत नव्हते. त्यामुळे त्यांची सर्व बाजूने अडचण झाली. पैसे येण्याचे सर्व मार्ग बंद झाले. फायनान्स कंपनीचे हप्ते भरण्यासाठी फोन येऊ लागले. त्यानंतर अभिजित यांनी स्वरुप महिला संस्था कंपनीचे कॉन्ट्रक्ट घेऊन आळंदी नगरपरिषदेत काम सुरू केले. दीड वर्षांनी कॉन्ट्रक्ट बंद पडल्याने परत आर्थिक परिस्थिती हलाखीची झाली. या साऱ्या प्रकारात अभिजीत यांची मानसिक स्थिती खूप ढासल्याने याच तणावात त्यांनी टोकाचे पाऊल उचलून आत्महत्या केली. त्यापूर्वी त्यांनी सुसाईड नोट लिहून ठेवली आहे. याप्रकणी अभिजित यांच्या पत्नीने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात त्यांच्या सासु कुसुम कदम, सासरे मच्छिंद्र कदम व दीर अनिकेत कदम यांच्या विरोधात तक्रार दिली आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नितीन राठोड करत आहेत.