लेखक राजन खान यांच्या मुलाची तळेगाव दाभाडे येथे आत्महत्या
Kmप्रसिद्ध लेखक राजन खान यांचा मुलगा डेबू राजन खान (वय २७) याने आर्थिक विवंचनेतून तळेगाव दाभाडे येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. सोमवारी (२ ऑक्टोबर) दुपारी सोमाटणे फाटा येथील शिंदे वस्ती परिसरात असणाऱ्या सोसायटीमधील फ्लॅटमध्ये ही घटना घडली. आत्महत्येपूर्वी त्याने एक चिठ्ठी लिहून ठेवली असून, आर्थिक विवंचनेतून आत्महत्या करीत असल्याचा त्यात उल्लेख आहे.
तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सत्यवान माने यांनी दिलेल्या माहितीनुसार, डेबू खान हा घरी एकटा राहत असल्याची माहिती मिळाली आहे. त्याने सोमवारी दुपारच्या वेळेत पंख्याला लटकून गळफास घेत आत्महत्या केली आहे. आत्महत्या केली तेंव्हा तो घरी एकटाच होता. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. डेबू याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी तळेगाव येथील रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.
डेबू बरोबर फ्लॅटवर आणखी कोण कोण राहत होते, त्याचे कुठे आर्थिक व्यवहार सुरू होते का, याचा तपास पोलीस करत आहेत.