हे काय पुण्यात रिक्षाचालकाला घर दाखवून विकला कुंटणखाना

तथाकथित गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या महिलेने रिक्षाचालकाला सात वर्षांपूर्वी बुधवार पेठेतील घर विकून अद्याप त्याचा ताबा दिला नसल्याचे समोर आले आहे. या घरात बेकायदा शरीरविक्रयाचा व्यवसाय चालत असल्याचा आरोप नव्या मालकाने केला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Amol Warankar
  • Tue, 5 Sep 2023
  • 02:10 pm
Pune Crime News

Pune Crime News : रिक्षाचालकाला घर दाखवून विकला कुंटणखाना

मुख्य आरोपी असलेली महिला फरार, सात वर्षांपासून जागेचा ताबाही मिळेना, पोलीसदेखील असहकाराच्या भूमिकेत

तथाकथित गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या महिलेने रिक्षाचालकाला सात वर्षांपूर्वी बुधवार पेठेतील घर विकून अद्याप त्याचा ताबा दिला नसल्याचे समोर आले आहे. या घरात बेकायदा शरीरविक्रयाचा व्यवसाय चालत असल्याचा आरोप नव्या मालकाने केला आहे.

खडकीत राहणारे रमेश केशव चव्हाण असे या घरमालकाचे नाव आहे. ते रिक्षाचालक असून गेली दोन वर्षे विश्रामबागवाडा आणि फरासखाना पोलीस स्टेशनच्या पायऱ्या झिजवत आहेत. चव्हाण हे पोलीस आयुक्तालयातही जाऊन आले; पण त्यांना दाद मिळाली नाही. लाखो रुपयांची आयुष्यभराची बचत खर्च करून त्यांनी शहराच्या मध्यवस्तीत घर घेण्याचे स्वप्न पहिले. हवा तसा व्यवहारही जुळून आला. पण पुढे जे वाढून ठेवले होते, ते धक्कादायक होते. त्यांनी २९ लाख ७५ हजार रुपये मोजून बुधवार पेठेत  २०१६ मध्ये हे घर विकत घेतले, पण व्यवहार पूर्ण झालाच नाही. पैसे घेऊन मालकाने घर देण्यास नावावर नोंदणी करुन देण्यास  नकार दिला.

चव्हाण यांनी यासंदर्भात आसमा जफर खान उर्फ पूजा लालबहादूर शर्मा (रा. दिघी  यांच्याविरूद्ध तसेच तिचा पती जफर हसमत खान आणि सविता थापा यांच्याविरुद्ध रितसर तक्रार फरासखाना पोलीस स्टेशनमध्ये केली आहे. तक्रारदारांच्या मते,  आसमा खान हिचेवर एकूण १८ गुन्हे दाखल असून, दोन गुन्ह्यांमध्ये तिला जामीन नाकारण्यात आलेला आहे. सध्या ती फरार आहेत. ती समस्त भारत देशामध्ये आसमा जफर खान, आसमा झेड. खान, पूजा शर्मा या नावाने वावरत आहे.

तक्रारदार चव्हाण म्हणाले, ‘‘हे घर आसमा हिने बेकायदेशीररित्या सविता थापा हिला गैरधंद्यासाठी वापरण्याकरिता दिल्याचे माझ्या लक्षात आले. सध्या थापा ही मिळकत बेकायदेशीररित्या वापरत आहे. तसेच अवैध धंद्याला प्रोत्साहन देत आहे. सदर मिळकतीवर पोलिसांनी अनेकदा कारवाई केलेली आहे. विशेष बाब म्हणजे, माहिती अधिकारात आसमावरील गुन्ह्यांची माहिती फरासखाना पोलीस स्टेशनला माहिती अधिकार कायद्यांतर्गत मागितली असता ‘‘या नावाच्या व्यक्तीवर गुन्हा आढळ होत नाही,’’ असे उत्तर मिळाले. ही महिला वेगवेगळ्या नावांनी वावरत असल्याचे मी निदर्शनास आणून दिले. मात्र त्याचा उपयोग झाला नाही. आसमा हिने मला रितसर करारनाम्याद्वारे ही मालमत्ता मला विकली.  पण ताबा दिला नाही. घर अवैध व्यवसायासाठी वापरले जात असल्याने ते केव्हाही जप्त होऊ शकते. माझ्या मिळकतीला पोलीस संरक्षण मिळावे आणि आसमाचा शोध पोलिसांनी घ्यावा, अशी माझी मागणी आहे.’’या संदर्भात फरासखाना पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक दादासाहेब चुडप्पा म्हणाले, ‘‘या प्रकरणी सर्व शक्यता लक्षात घेऊन तपास सुरू आहे. कागदपत्रांची छाननी केल्यावर संबंधितांवर योग्य ती कारवाई केली जाईल.’’

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest