संग्रहित छायाचित्र
मद्यधुंद असलेल्या दोन मजुरांमध्ये भांडण झाले. यावेळी एकाने दुसऱ्या मजुराच्या तोंडावर सिमेंटची वीट मारून जखमी केले. यामुळे मजुराचा मृत्यू झाला. या खूनप्रकरणी रावेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. किवळे येथे सोमवारी (४ सप्टेंबर) रात्री साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली.
विवेक गणेश पासवान (वय २४, मूळ रा. उत्तर प्रदेश), असे खून झालेल्या मजुराचे नाव आहे. शिवकुमार घनश्याम प्रजापती (वय १९, रा. मूळ रा. बिरैचा कला, पोस्ट. खंबा, ता. रिधवली, जि. बस्ती, उत्तर प्रदेश) यांनी या प्रकरणी सोमवारी (४ सप्टेंबर) रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार दिनेश विलास यादव (२०, मूळ रा. बिरैचा कला, पोस्ट. खंबा, ता. रिधवली, जि. बस्ती, उत्तर प्रदेश) याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई-पुणे महामार्गालगत किवळे येथे रुणाल गेटवे सोसायटीजवळ निर्माण माईल स्टोन ही बांधकाम साईट आहे. या साईटवर विवेक पासवान, संशयित दिनेश यादव आणि शिवकुमार प्रजापती यांच्यासह अन्य काही जण मजूर म्हणून फरशी बसविण्याचे काम करतात. त्यातील विवेक हा इतर पाच जणांसह साईटवरील पत्र्याच्या खोलीमध्ये राहण्यास होता. त्याच्यासह सोबतच्या इतर मजुरांचा रविवारी पगार झाला. त्यामुळे विवेक याने काही मजुरांसह पार्टी केली. त्यानंतर विवेक याच्या खोलीतील इतर चौघे मजूर झोपले असता विवेक आणि दिनेश यादव हे दोघेही पुन्हा मद्यपानासाठी गेले. मद्यपान करून आल्यानंतर त्यांच्यामध्ये किरकोळ भांडण झाले. यात दिनेश यादव याने विवेक पासवान याच्या तोंडावर सिमेंटची वीट मारली. यात गंभीर जखमी होऊन विवेक याचा मृत्यू झाला. त्यानंतर दिनेश यादव हा तेथून पळून गेला. दरम्यान, याबाबत माहिती मिळताच रावेत पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात शवविच्छेदन करून विवेक याचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. दिनेश यादवचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.