ती ओरडत राहिली... तो वार करत राहिला अन्...
अवघ्या दहा दिवसांपूर्वीच भाडे करारावर घेतलेल्या घरात आपल्या चार वर्षांच्या चिमुकलीसह राहायला आलेल्या कुटुंबातील पती-पत्नीची भांडणे झाली. थोड्या वेळाने आरडाओरडा सुरू झाला. पत्नी जिवाच्या आकांताने ओरडू लागली. निर्दयी पती मात्र चाकूने तिच्यावर सपासप वार करीत राहिला. अघटित घडत असल्याची चाहूल लागलेल्या शेजाऱ्यांनी त्यांच्या घराची कडी बाहेरून लावून घेतली. पोलीस आल्यावर दार उघडले तर... समोर रक्ताच्या थारोळ्यात गतप्राण होऊन निपचित पडलेली पत्नी आणि मृतदेहाजवळ उभा असलेला रक्ताने माखलेला आरोपी पती, असे विदारक चित्र लोहगाव येथील संतनगरमध्ये पाहायला मिळाले.
परपुरुषाशी संबंध असल्याच्या संशयावरून पतीने स्वतःच्या पत्नीवर धारदार चाकूने वार करीत तिचा खून केला. ही घटना शनिवारी (९ सप्टेंबर) रात्री नऊच्या सुमारास लोहगाव-वाघोली रस्त्यावरील संतनगर परिसरात घडली. या प्रकरणी विमानतळ पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. आशिष सुनील भोसले (वय ३२, रा. संतनगर लोहगा, मूळ रा. मांजरी बुद्रुक) असे आरोपीचे नाव आहे. त्याला घटनास्थळावरूनच ताब्यात घेण्यात आले आहे. रूपाली उर्फ बबिता आशिष भोसले (वय ३५) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी स्वप्नील बाळासाहेब खांदवे (वय ३०) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आशिष हा हाउसकीपिंगची कामे करतो. तर, त्याची पत्नी रूपाली उर्फ बबिता ही मूळची कोलकाता येथील रहिवासी होती. मागील काही वर्षांपासून ती कामानिमित्त पुण्यामध्येच राहात होती. ती देखील मिळेल ते काम तसेच लग्नामध्ये वाढपी म्हणून कामे करीत होती. त्यांना चार महिन्यांची मुलगी आहे. आशिष याला तिच्या चारित्र्याविषयी संशय होता आणि तिचे परपुरुषाशी संबंध असल्याचा देखील संशय होता.
फिर्यादी स्वप्नील खांदवे हे लोहगाव येथील संतनगरमध्ये असलेल्या गणपती मंदिराजवळ तीन वर्षांपासून राहतात. त्यांचा प्लॉटिंगचा व्यवसाय आहे. त्यांच्या घराशेजारील जागेवर पत्र्याच्या पाच खोल्या भाड्याने दिलेल्या आहेत. दहा दिवसांपूर्वी आशिष भोसले आणि त्याची पत्नी बबिता आणि चार महिन्यांची मुलगी हे भाड्याने राहण्यास आले होते. शनिवारी रात्री आठच्या सुमारास खांदवे हे मोटरसायकलवरून त्यांच्या मित्रांकडे गेले होते. त्यावेळी त्यांना पत्नीने फोन करून आशिष आणि बबिता यांच्यामध्ये जोरदार भांडणे सुरू असल्याचे सांगितले. तसेच आशिष शिवीगाळ करून पत्नीला मारहाण करीत असल्याचे सांगत लवकर घरी येण्यासंदर्भात कळवले होते. खांदवे हे तातडीने घरी पोहोचले. दरम्यान, त्यांच्या पत्नीने मोबाईलवरून पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून पोलिसांना बोलावून घेतले होते. खांदवे घरी पोहोचले त्यावेळेस आजूबाजूचे खूप सारे लोक जमा झालेले होते.
लोहगाव पोलीस चौकीवरून दोन पोलीस कर्मचारी त्या ठिकाणी आले होते. भाडेकरू भोसले यांच्या घरातून शिवीगाळ होत असल्याचा आवाज येत होता. नागरिकांनी घाबरून त्यांच्या खोलीचा दरवाजा बाहेरून बंद करून घेतला होता. पोलीस आल्यानंतर त्यांनी हा दरवाजा उघडला. दरवाजाजवळ बबिता ही रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत पडलेली होती आणि आशिष दरवाज्याजवळ उभा होता. त्याला पोलीस आणि खांदवे यांनी घडल्या प्रकाराबाबत विचारणा केली. त्यावेळी त्याने बबिताचे अन्य पुरुषांसोबत संबंध असून त्यावरून त्यांची भांडणे झाली, असे सांगितले. या रागातून घरातील चाकूने बायकोच्या गळ्यावर, मानेवर आणि पोटावर सपासप वार करून तिचा खून केल्याची कबुली दिली. खुनासाठी वापरलेला चाकू घरामध्येच फेकून दिल्याचे सांगताच पोलिसांनी आशिषला घटनास्थळावरूनच ताब्यात घेतले. रुग्णवाहिकेमधून बबिताचा मृतदेह ससून रुग्णालयामध्ये हलविण्यात आला. या ठिकाणी तपासणी केली असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक संजय धामणे करीत आहेत. बबिता ही मूळची कोलकाता येथील रहिवासी होती. तिच्या नातेवाईकांचा अद्याप शोध लागलेला नाही. तिच्या आई-वडिलांबाबत कोणतीही माहिती पोलिसांना मिळत नसल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सोंडे यांनी सांगितले. त्यामुळे तिचा मृतदेह ससून रुग्णालयात शीतगृहामध्ये ठेवण्यात आलेला आहे.