संग्रहित छायाचित्र
पुणे : कल्याणीनगर येथे झालेल्या पोर्शे अपघात प्रकरणामध्ये आरोपी अल्पवयीन मुलाचे आणि त्याच्या मित्रांच्या रक्ताचे नमुने बदलून पुरावा नष्ट करण्याच्या आरोपाखाली पोलिसांनी अटक केलेल्या ससून रुग्णालयाच्या न्यायवैद्यक विभागाचे तत्कालीन प्रमुख डॉ. अजय तावरे, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी हाळनोर आणि शिपाई अतुल घटकांबळे यांच्याविरुद्ध फौजदारी खटला चालविण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली. ससून रुग्णालयाच्या वैद्यकीय शिक्षण विभागाने हे मंजुरी पत्र दिले. हे पत्र विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनी गुरुवारी विशेष न्यायाधीश यू. एम. मुधोळकर यांच्या न्यायालयात दाखल केले. त्यामुळे या तिघांविरुद्ध न्यायालयीन प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.
रक्ताचे नमुने बदलून पुरावा नष्ट केल्या प्रकरणी आरोपी विशाल अगरवाल, त्याची पत्नी शिवानी, ससूनमधील डॉक्टरांसह सात आरोपींविरुद्ध आरोप निश्चिती करून सुनावणीचा मार्ग मोकळा झाला आहे. कल्याणीनगर येथे रविवार, १९ मे रोजी मध्यरात्री अडीचच्या सुमारास हा अपघात घडला होता. १७ वर्षीय अल्पवयीन आरोपीने त्याची पावणेदोन कोटी रुपयांची आलीशान ‘पोर्शे’ कार भरधाव चालवीत एका मोटारसायकलला धडक दिली होती. या धडकेत संगणक अभियंता असलेल्या अनिश अवधिया (वय २७) आणि अश्विनी कोस्टा (वय २४) यांचा जागीच मृत्यू झाला होता. याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवाल याच्या १७ वर्षीय मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणात आतापर्यंत तीन गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.
आरोपी अल्पवयीन मुलाला वाचविण्यासाठी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या मुलाच्या जागी चालकाला उभे करून त्याच्यावर आरोप घालण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. यासोबतच, मुलाला ससून रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले असता त्याच्या रक्ताचे नमुने बदलण्यात आले. त्याच्या जागी त्याच्या आईच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले होते. तसेच, त्याच्या सोबत असलेल्या अन्य दोन मुलांचेही रक्त नमुने बदलण्यात आले होते. हे रक्ताचे नमुने ससूनच्या न्याय वैद्यक व विषशास्त्र विभागाचा प्रमुख डॉ. अजय तावरे याच्या सांगण्यावरून डॉ. श्रीहरी हाळनोर याने बदलले होते. डॉ. तावरे याच्यासोबत अशपाक मकानदार हा संपर्कात होता. तसेच, तो स्वत: पोलीस ठाण्यात हजर होता. त्यानंतर तो ससून रुग्णालयात देखील गेला होता. डॉ. हाळनोरच्या कक्षात तो दोन तास होता. याप्रकरणात रक्त नमुने बदलण्यासाठी डॉ. तावरे आणि डॉ. हाळनोर यांना तीन लाख रुपये पैसे दिल्याचे तपासात उघडकीस आले. शिपाई घटकांबळे याच्यामार्फत पैसे घेण्यात आले होते. ते पैसे पुढे डॉ. हाळनोरकडे देण्यात आले होते.
पोलिसांनी घटकांबळेकडून ५० हजार रुपये तर, डॉ. हाळनोरकडून अडीच लाख रुपये जप्त केले होते. अल्पवयीन आरोपीला १९ मे रोजी येरवड्यातील बाल न्याय मंडळाच्या आवारात हजर करण्यात आले होते. त्यावेळी मकानदार दुचाकीवरून तेथे आला होता. दुचाकीच्या डिक्कीत त्याने रक्कम ठेवली होती. बाल न्याय मंडळाच्या आवारातच घटकांबळे याला मकानदार याने तीन लाख रुपये दिले होते. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड झाली होती. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन त्यावरून देखील तपास केला.
पुरावा नष्ट केल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवाल, त्याची पत्नी शिवानी यांच्यासह या तिघांवर आणि अश्पाक मकानदार आणि अमर गायकवाड यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले. डॉ. तावरे, डॉ. हाळनोर, घटकांबळे हे शासकीय कर्मचारी असल्याने, त्यांच्याविरोधात फौजदारी खटला चालविण्यास परवानगी मिळवण्यासाठी पुणे पोलिसांनी फौजदारी प्रक्रिया संहितेच्या (सीआरपीसी) कलम १९७ प्रमाणे राज्य शासनाकडे प्रस्ताव सादर केला होता. राज्य शासनाने आरोपींविरोधात फौजदारी खटला चालविण्यास मंजुरी दिली. आरोप निश्चित झाल्यावर सुनावणी सुरू होणार आहे, असे विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनी सांगितले.