बनावट कागदपत्रांच्या आधारे वनविभागाच्या दोन हजार 942 गुंठे जमिनीची विक्री
वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या बनावट पात्रांच्या आधारे वन विभागाच्या दोन हजार 942 गुंठे जमिनीची विक्री करत शासनाची फसवणूक केल्याचा प्रकार दुय्यम निबंधक मावळ दोन, तळेगाव दाभाडे येथे उघडकीस आला. 16 डिसेंबर 2020 ते 21 जानेवारी 2021 या कालावधीत हा प्रकार घडला. (Pimpri Chinchwad News)
रफिक दाऊद रुवाला (Rafiq Dawood Ruwala) (वय 73), आली अजगर (वय 20), एक महिला (सर्व रा. नेरूळ रोड, ठाणे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी आंबवणे येथील वनपाल संजय आहिरराव यांनी मंगळवारी (दि. 21) तळेगाव दाभाडे पोलीस (Talegaon Dabhade Police) ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ताम्हिणी वन परिक्षेत्राच्या अखत्यारीत काही क्षेत्र खासगी वन संपादन अधिनियम 1975 अंतर्गत येते. त्या जमिनीची विक्री करण्यासाठी वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांची परवानगी अनिवार्य असते. आरोपींनी या जमिनीतील दोन हजार 942 गुंठे जमीन विक्रीयोग्य असल्याचे वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या नावाचे बनावट पत्र तयार केले.
त्या पत्राच्या आधारे दुय्यम निबंधक मावळ दोन, तळेगाव दाभाडे येथे तीन वेगवेगळे दस्त करून वन विभागाचे क्षेत्र बेकायदेशीरपणे हस्तांतरित केले. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.