Robbery
पुणे : शहरातील घरफोडयांचे (Robbery) सत्र वाढले असून चोरट्यांची मजल आता थेट घरामध्ये घुसून मारहाण करून चोरी करण्यापर्यंत गेली आहे. मांजरी मधील कोद्रेनगरमध्ये असलेल्या ट्रॅक्युलिटी सोसायटीमध्ये शनिवारी मध्यरात्री साडे बारा ते पहाटे चारच्या दरम्यान ही घटना घडली. तीन चोरट्यांनी घरातील व्यक्तींना लोखंडी हत्याराचा धाक दाखवीत एक लाख ३४ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. या घटनेमुळे मांजरी परिसरातील नागरिक हादरून गेले आहेत.
याप्रकरणी रोशन जयवंत माळी (वय ४८, रा. ट्रॅक्युलिटी सोसायटी, कोद्रेनगर, मांजरी) यांनी फिर्यादी आहे. याप्रकरणी २५ ते ३० वयोगटातील तीन व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन चोरटे ट्रॅक्युलिटी सोसायटीमध्ये घुसले. त्यांनी फिर्यादी माळी यांच्या घराच्या स्वयंपाक गृहाच्या खिडकीचे ग्रील उचकटले. घरामध्ये प्रवेश करून फिर्यादी यांच्या आई कुमुदिनी आणि वडील जयवंत यांना लोखंडी हत्याराचा धाक दाखवला. त्यांच्याकडे लोखंडी रॉड आणि दांडके देखील होते.
या दोघांनाही त्यांनी काही हालचाल अगर आरडाओरडा केल्यास मारून टाकण्याची धमकी दिली. त्यानंतर कुमुदिनी यांच्या उजव्या हाताला शस्त्राने दुखापत केली. त्यांना धमकावत घरातील ५३ ग्रॅम सोन्याचे दागिने, दहा ग्रॅम चांदीचे दागिने आणि ५५ हजार रुपयांची रोकड जबरदस्तीने लंपास केली. या घटनेमुळे मांजरी परिसरात घबराट पसरली आहे.