संग्रहित छायाचित्र
कल्याणीनगर अपघात प्रकरणात (Kalyaninagar Porsche Car Accident) अल्पवयीन आरोपीला कार चालविण्यास दिल्याप्रकरणी आरोपी विशाल अगरवाल याला शुक्रवारी (दि. २१) पंधरा हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर विशेष न्यायालयाने जामीन मंजूर केला. मात्र, जामीन झाला असला, तरी चालकाला धमकावणे, तसेच अल्पवयीन मुलाच्या रक्ताच्या नमुन्यात फेरफार करून पुरावा नष्ट करणे या गुन्ह्यांमध्ये तो न्यायालयीन कोठडीत असल्याने विशाल अगरवालचाचा मुक्काम येरवडा कारागृहातच असणार आहे.
अपघाताच्या घटनेपूर्वी या अल्पवयीन मुलाला आणि त्याच्या मित्रांना मद्य पुरविल्याप्रकरणी ‘कोझी’ व ‘ब्लॅक’ या पबच्या मालक, व्यवस्थापक, कर्मचाऱ्यांची जामिनावर सुटका करण्यात आली. कल्याणीनगर येथे १८ मे च्या मध्यरात्री अल्पवयीन मुलाने ‘पोर्श’ कार भरधाव चालवून धडक दिल्याने दुचाकीस्वार तरुण-तरुणीचा मृत्यू झाला होता. या मुलाकडे वाहन परवाना नसतानाही त्याला कार चालवायला दिल्याप्रकरणी विशाल अगरवाल (Vishal Agarwal) (वय ५०, रा. ब्रह्मा सनसिटी, वडगाव शेरी) याला अटक करण्यात आली होती.
अपघाताच्या घटनेपूर्वी आरोपीने आपल्या मित्रांसोबत मुंढव्यातील ‘कोझी’ आणि ‘ब्लॅक’ पबमध्ये पार्टी केली होती. त्यांच्या वयाची खातरजमा न करता दोन्ही पबमध्ये मद्यविक्री केल्याबद्दल ‘कोझी’ पबच्या मालकाचा मुलगा नमन प्रल्हाद भुतडा (वय २५, रा. ए ७, पद्मविलास एन्क्लेव्ह, वानवडी), व्यवस्थापक सचिन अशोक काटकर (वय ३५, रा. साईसदन ए २, तुकाईदर्शन, हडपसर) आणि ‘ब्लॅक’ पबचा साहाय्यक व्यवस्थापक संदीप रमेश सांगळे (वय ३५, रा. ऑस्कर शाळेसमोर, फ्लॅट नं. १०७, पद्मावती हाइट्स, मुंढवा), बार काउंटरचा व्यवस्थापक जयेश सतीश गावकर (वय २३, रा. केशवनगर) आणि कर्मचारी नीतेश धनेश शेवानी (वय ३४ रा. एनआयबीएम) यांना अटक करण्यात आली. या सहा आरोपींवर मोटार वाहन कायद्याच्या कलम ३, ५ व १९९ ए आणि बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) कायद्याच्या कलम ७५ व ७७ नुसार येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणात न्यायालयीन कोठडी झाल्यावर त्यांनी जामिनासाठी अर्ज केला. सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील विद्या विभूते आणि बचाव पक्षातर्फे अॅड. एस. के. जैन, अॅड. सुधीर शहा, अॅड. अमोल डांगे आणि अॅड. प्रशांत पाटील यांनी युक्तिवाद केला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यावर विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांनी आरोपींना जामीन मंजूर केला.