पुणे: अपहरण झालेल्या बाळाला पाहताच आईच्या भावनांचा बांधच फुटला; गुजरातमध्ये केलेल्या कारवाईत पोलिसांकडून एका महिलेसह दोघांना अटक

पुणे : पुण्यामधून रेल्वेने झारखंडला निघालेल्या महिलेला बोलण्यात गुंतवून अवघ्या सात महिन्यांच्या बालकाचे अपहरण केले. या अपहरणामुळे व्यतिथ झालेल्या आईने बाळाच्या विरहात फोडलेला हंबरडा ऐकून पोलीस देखील भावनिक झाले. त्यांनी हा गुन्हा गांभीर्याने घेत तात्काळ तपासाला सुरुवात केली.

Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

पुणे : पुण्यामधून रेल्वेने झारखंडला निघालेल्या महिलेला बोलण्यात गुंतवून अवघ्या सात महिन्यांच्या बालकाचे अपहरण केले. या अपहरणामुळे व्यतिथ झालेल्या आईने बाळाच्या विरहात फोडलेला हंबरडा ऐकून पोलीस देखील भावनिक झाले. त्यांनी हा गुन्हा गांभीर्याने घेत तात्काळ तपासाला सुरुवात केली. लोहमार्ग पोलिसांनी याविषयी कसून तपास केला. आरोपी महिलांचा माग काढत अहमदाबादमधून एका महिलेसह दोघांना अटक करण्यात आली. अपहृत बालकाला पालकांच्या ताब्यात देण्यात आले. बाळाला पाहताच आईच्या भावनांचा बांध फुटला.

मोहम्मद खान कुरेशी (वय २७), नजमा अक्रम खान कुरेशी (वय २५) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत बालकाची आई पूजा संतोष दास (वय २८, रा. झारखंड) यांनी फिर्याद दिली होती. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पूजा दास या सध्या कुटुंबासह पुण्यात राहण्यास आहेत. त्या मुळगावी जाण्यासाठी १७ सप्टेंबर रोजी पुणे रेल्वे स्थानकावर कुटुंबासह आल्या होत्या. त्यांच्याबरोबर त्यांचा सात महिन्यांचा मुलगा देखील होता. रेल्वे स्थानकाच्या आवारात बसलेल्या असतानाच आरोपी मोहम्मद आणि नजमा यांनी त्यांच्याशी बोलण्याचे नाटक करीत ओळख करून घेतली. त्यांना बोलण्यात गुंतवून ठेवत बालकाला नजमाने आपल्याजवळ घेतले. दास यांचे लक्ष नसल्याची संधी साधून मोहम्मद आणि नजमा पसार झाले.

बालकाचे अपहरण करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली होती. लोहमार्ग पोलिसांनी तीन पथके तयार केली. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाद्वारे आरोपींचा माग काढण्यास सुरुवात करण्यात आली. आरोपी अहमदाबादमधील उनावा परिसरात असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले. पोलिसांनी अहमदाबादला धाव घेत नजमा आणि मोहम्मद यांना ताब्यात घेत बालकाची सुखरुप सुटका केली. पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अतिरिक्त अधीक्षक रोहीदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद खोपीकर, इरफान शेख, पोलीस निरीक्षक स्मिता वासनिक, उपनिरीक्षक स्वप्नील वाघमारे, सचिन नाझरे, पोलिस कर्मचारी सुनील कदम, अनिल टेके, आनंद कांबळे, निलेश बीडकर, अनिल दांगट, विकास केंद्रे, जयश्री ढाकरे यांनी ही कारवाई केली.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest