संग्रहित छायाचित्र
मुळशीतील सुर्वेवाडीतील एका शेतकाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी हिंदू राष्ट्र सेनेचा अध्यक्ष धनंजय देसाई याचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला. सत्र न्यायाधीश व्ही. डी. निंबाळकर यांनी हा आदेश दिला. सुर्वेवाडीत शेतकऱ्यास देसाई व त्याच्या साथीदारांनी मिळून जमीन नावावर करून न दिल्यामुळे तलवारीसह लोखंडी रॉडच्या सहाय्याने प्राणघात हल्ला केला होता. मुळशीतील दारवली गावात 1 ऑगस्ट रोजी ही घटना घडली होती.
या प्रकरणी प्रदीप शिवाजी बलकवडे (वय 35, रा. दारवली, ता. मुळशी, जि. पुणे) यांनी पौड पोलीस ठाण्यात जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी फिर्याद केली होती. त्यावरून धनंजय देसाई व त्याच्या साथीदाराविरोधात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर देसाई याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली होती. या गुन्ह्यात जामीन मिळण्यासाठी देसाईने पुण्याच्या जिल्हा व सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता.
सरकारी पक्षातर्फे ऍड. विलास घोगरे पाटील यांनी, तर फिर्यादीतर्फे अॅड.. अमेय बलकवडे, अॅड.. सतिश कांबळे, अॅड.. सुरज शिंदे आणि अॅड.. ऋषिकेश कडू यांनी बाजू मांडली. देसाई याच्यावर विविध पोलीस स्टेशनमध्ये तब्बल 17 गुन्हे दाखल आहेत. यामध्ये जातीय तेढ निर्माण करणे, खून, हत्यार कायद्यांचे उल्लंघन अशा गुन्ह्यांचा समावेश आहे. गुन्ह्यातील फरार आरोपींचा शोध घ्यायचा आहे. गुन्ह्यात वापरलेल्या पिस्तुलाचा तपास करायचा आहे. घटना घडल्यानंतर चर्चा करताना देसाई सीसीटीव्हीमध्ये दिसून आला आहे. त्यामुळे त्याचा जामीन फेटाळण्यात यावा, असा युक्तिवाद सरकारी वकील विलास घोगरे पाटील यांनी केला.