पुणे: लाखों रुपयांचे दागिने घेऊन सराफ पसार

पुणे : कात्रज परिसरात सराफी दुकान टाकून अनेक ग्राहकांचा विश्वास संपादन करून त्यांचे लाखो रुपयांचे दागिने पुन्हा नव्याने घडवून घेण्याच्या बहाण्याने लंपास करण्यात आले. हे दागिने घेऊन दुकान बंद करून आरोपी प्रसार झाल्याची घटना समोर आली आहे.

संग्रहित छायाचित्र

पुणे : कात्रज परिसरात सराफी दुकान टाकून अनेक ग्राहकांचा विश्वास संपादन करून त्यांचे लाखो रुपयांचे दागिने पुन्हा नव्याने घडवून घेण्याच्या बहाण्याने लंपास करण्यात आले. हे दागिने घेऊन दुकान बंद करून आरोपी प्रसार झाल्याची घटना समोर आली आहे. हा प्रकार २ फेब्रुवारी २०२३ पासून २५ जून २०२४ पर्यंत आंबेगाव बुद्रुक येथील माऊली ज्वेलर्स या दुकानामध्ये घडला. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharti Vidyapith Police Station) भारतीय दंड विधान ४०६, ४२०, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

बाबुराव तुकाराम कांबळे (रा. आंबेगाव बुद्रुक), निर्मला बाबुराव कांबळे, अनिल बाबुराव कसबे (वय ३३, रा. सन व्ह्यू सोसायटी, आंबेगाव बुद्रुक), सुनील बाबुराव कसबे (वय ३३) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी शितल राजेंद्र गायकवाड (रा. प्राईम रोज अपार्टमेंट, आंबेगाव बुद्रुक) यांनी फिर्याद दिली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दशरथ पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी कांबळे आणि कसबे यांनी आंबेगाव बुद्रुक या ठिकाणी माऊली ज्वेलर्स नावाचे सराफी दुकान उघडले होते. या दुकानामध्ये येणाऱ्या ग्राहकांना त्यांनी विश्वासात घेतलेले होते. फिर्यादी शितल गायकवाड यादेखील त्यांच्या दुकानामध्ये ग्राहक म्हणून जात होत्या. आरोपींनी फिर्यादीला दहा दहा तोळे वजनाचे तीन दागिने दिल्यास ३० तोळे वजनाचे तीन राणीहार अधिक चांगल्या पद्धतीने बनवून देतो असे आमिष दाखवले. त्यांचा विश्वास संपादन करून त्यांच्याकडून १२ लाख ५० हजार रुपयांचे २५ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने आणि पाच लाख रुपये रोख असे एकूण १७ लाख ५० हजार रुपये त्यांच्याकडून उकळण्यात आले. 

मात्र, ठरल्याप्रमाणे त्यांना दहा दहा ग्रॅम वजनाचे प्रत्येकी तीन राणीहार बनवून न देता त्यांच्या २५ तोळे वजनाच्या दागिन्यांचा अपहार करण्यात आला. तसेच, पाच लाख रुपये घेऊन आरोपींनी पोबारा केला. याच पद्धतीने अश्विनी आशिष शिंदे (रा. चिंतामणी रेसिडेन्सी), मोनिका दादासाहेब माने (रा. दळवी नगर, आंबेगाव बुद्रुक), उमेश सिद्धाप्पा कलशेट्टी (रा. कल्पकसृष्टी, आंबेगाव बुद्रुक), राजेंद्र पाठक (रा. आंबेगाव बुद्रुक), पूजा सुनील चितळे (रा. आंबेगाव बुद्रुक) यांची देखील फसवणूक करण्यात आली. अशाप्रकारे लाखो रुपयांचे दागिने आणि रक्कम घेऊन आरोपी पसार झाले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक धीरज गुप्ता करीत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest