भाई कॉलिंक फ्रॉम जेल; तुरुंगातील सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह....
सराईत गुन्हेगाने भाई, डॉन राज्याच्या विविध तुरुंगात गेले अनेक वर्षे असले तरी त्यांचे व्हिडिओ गेल्या काही दिवसांपासून तुरुंगातून सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. कैदेत असलेल्या गुन्हेगारांचे व्हीडीओ व्हायरल कसे होतात, हा लाखमोलाचा प्रश्न असून यातून तुरुगातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. गुन्हेगारांचे व्हीडीओ त्यांच्या साथीदारांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर येत असून सध्या तुरुंग प्रशासनाने येणाऱ्यांशी काचेच्या आडून इंटरकॉमवर बोलण्याची सुविधा गुन्हेगारांना उपलब्ध करून दिलेली आहे. याच सुविधेचा गैरवापर होऊन व्हीडीओ, फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचे दिसते.
कैद्यांचे फोटो अशा पद्धतीने बाहेर येत असल्याने तुरुंगाची सुरक्षितता धोक्यात आहे. अभ्यागतांना तुरुंगात त्यातून छुपा संदेश असलेले व्हीडीओ, फोटो समाजमा आत नेण्यास बंदी असताना असे होतेच कसे, हा प्रश्न या उभा राहिला आहे.
इंस्टाग्राम, व्हॉट्सअप, फेसबुक अशा समाजमाध्यमावर कैद्यांचे फोटो प्रसारित होत आहेत. कैद्यांचे तुरुंगातील वेगवेगळ्या कृतीचे फोटो विशिष्ट व्यक्तीकडून जाणीवपूर्वक व्हायरल होत आहेत. तुरुंगात कैद्यांना भेटायला येणाऱ्या कोणालाही अगदी वकिलालाही मोबाईल आत नेता येत नाही. यामुळे कैद्यांचे फोटो कोण आणि कसे काढले जातात ?
प्रशासनच फोटोग्राफर बोलावून कैद्यांचे फोटो संबंधितांना देतात का? असा सवाल वाजेद खान बीडकर या वकिलाने उपस्थित केला आहे. अशा व्हीडीओचे स्क्रीन शॉट त्यांनी 'सीविक मिरर' ला उपलब्ध करून दिले आहेत.
वाजेद खान बीडकर याबाबत म्हणाले की, यापूर्वी अनेक वेळा तुरुंगामध्ये कैद्याजवळ मोबाईल सापडले आहेत. प्रशासनाच्या मदतीने मोबाईल उपलब्ध होतात, असे शिक्षा भोगून बाहेर आलेले कैदी सांगतात. कैद्याजवळ मोबाईल सापडल्यावर तपास केला जातो. काही प्रकरणात तुरुंग अधीक्षक निलंबनाची कारवाई करतात. मात्र त्यानंतरही पुन्हा कैद्याकडे मोबाईल आढळले आहेत. काही प्रकरणात भेटायला येणाऱ्यांना मोबाइल बाळगण्याची परवानगी दिलेली दिसते.
तुरुंगातील कैदी नातेवाईक, मित्र, साथीदार आणि इतरांना निरोप देण्यासाठी विरोधकांना, शत्रूना धमकावण्यासाठी ही कल्पना राबवत असावे असे मत एका पोलीस अधिकाऱ्याने व्यक्त केले.
काही दिवसांपूर्वी येरवडा तुरुंगात एका कैद्याकडे मोबाईल आढळला. तुरुंगात मोबाईल जॅमर यंत्रणा आहे. मात्र कैद्याकडे मोबाईल सापडल्याने जॅमर यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. यापूर्वी तुरुंगात मोबाईल सापडलेल्या प्रकरणाचा तपास लागलेला नाही. येरवडा तुरुंगात बराक क्रमांक एकमध्ये तपासणी सुरू असताना सुरक्षारक्षकांना मोबाईल सापडला होता. त्यामध्ये सिम कार्ड आणि बॅटरीही होती. त्यावरून कैदी बाहेर फोन करत होता. ज्याच्याजवळ हा मोबाईल सापडला त्याला खुनाच्या गुन्ह्यात शिक्षा झाली होती. काही कैदी तुरुंगात मोबाईल आणून इतर कैद्यांना विकतात. "धाक दाखवून खंडणी, वसुली, धमकी देणे असे प्रकार आरोपी आत असतानाही घडतात, ते अशा युक्त्यामुळेच. पैसा खर्च करण्याची तयारी असेल तर तुमच्या बराकीत हवे ते मिळू शकते, अगदी 'हवे' ते असे मत एका माजी अधिकाऱ्याने व्यक्त केले. या प्रकाराबाबत येरवडा येथील खुल्या तुरुंगाचे अधिकारी हेमंत पाटील म्हणाले की, कैद्याला मोबाईल वापरण्यास बंदी आहे. त्यांच्याकडे मोबाईल आणि बंदी असलेल्या अन्य वस्तू असणार नाही याची प्रशासन काळजी घेते. याबाबतच्या नियमावलीचे पालन करण्यासाठी वरिष्ठांचे तसे आदेश आहेत. त्याचे काटेकोरपणे पालन प्रशासन करते..