Pune Porsche accident: दोन डॉक्टरसह तिन्ही आरोपींना ३० मेपर्यंत पोलीस कोठडी

कल्याणीनगर अपघात प्रकरणात बिल्डरपुत्र अल्पवयीन कारचालकाला वाचविण्यासाठी त्याच्या रक्ताचा नमुना बदलून पुरावा नष्ट केल्याप्रकरणी ससूनच्या न्यायवैद्यक विभागाचा प्रमुख डॉ. अजय तावरे आणि आपत्कालीन विभागाचा मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी हाळनोर यांच्यासह एका शिपायाला अतुल घटकांबळेला न्यायालयाने ३० मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

संग्रहित छायाचित्र

कल्याणीनगर अपघात प्रकरणात (Kalyani Nagar Accident) बिल्डरपुत्र अल्पवयीन कारचालकाला वाचविण्यासाठी त्याच्या रक्ताचा नमुना बदलून पुरावा नष्ट केल्याप्रकरणी ससूनच्या न्यायवैद्यक विभागाचा प्रमुख डॉ. अजय तावरे आणि आपत्कालीन विभागाचा मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी हाळनोर यांच्यासह एका शिपायाला अतुल घटकांबळेला न्यायालयाने ३० मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

या आरोपींनी कोणाच्या सांगण्यावरून अल्पवयीन मुलाच्या रक्ताचा नमुना बदलला? त्यासाठी कोणाचे रक्त घेतले, याचा तपास करून संबंधितांना अटक करायची आहे, तसेच रक्ताचा नमुना बदलण्यासाठी या आरोपींनी लाचस्वरुपात घेतलेली रक्कम हस्तगत करायची आहे, पोलिसांनी सोमवारी (दि. २७) न्यायालयात सांगितले. त्यानंतर न्यायालयाने अजय तावरे (वय ३८, रा. गीता सोसायटी, कॅम्प), श्रीहरी हाळनोर (वय ३५, रा. बी. जे. वैद्यकीय मुलांचे वसतीगृह. मुळ रा. धाराशिव) आणि अतुल घटकांबळे (वय ३०, रा. सुंदरनगरी सोसायटी, सोमवार पेठ) यांना ३० मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. ए. पांडे यांनी हा आदेश दिला. (Pune Porsche accident

तत्पूर्वी, तिन्ही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले होते. अल्पवयीन आरोपीला न्यायालयीन प्रक्रियेत मदत करण्याच्या उद्देशाने या तिघांनी कट रचून सरकारी पदाचा गैरवापर करत त्याच्या रक्ताचा नमुना बदलून पुरावा नष्ट केला. यामध्ये आणखी काही आरोपींचा सहभाग असण्याची शक्यता असून, त्यासाठी आरोपींची समोरासमोर चौकशी करायची आहे. रक्ताचा नमुना बदलण्यासाठी आरोपींमध्ये लाच स्वरुपात आर्थिक व्यवहार झाला असून, त्या अनुषंगाने त्यांच्या घराची झडती घ्यायची आहे, तसेच त्यांच्या मोबाईलचे सायबर तज्ज्ञांच्या मदतीने विश्लेषण करायचे आहे. रक्ताचे नमुने घेतल्याच्या दिवशी आरोपींना भेटायला कोण कोण आले होते, याची माहिती घेण्यासाठी ससून रुग्णालयातील ‘सीसीटीव्ही’ चित्रीकरण तपासायचे आहे, तसेच आरोपींनी अल्पवयीन मुलाच्या रक्ताच्या मूळ नमुन्याची विल्हेवाट लावली आहे का, याची चौकशी करायची आहे. त्यासाठी आरोपींना पोलीस कोठडी देण्याची मागणी तपास अधिकारी सहायक आयुक्त सुनील तांबे, सरकारी वकील ॲड. नीलेश लडकत आणि ॲड. योगेश कदम यांनी केली. न्यायालयाने ती मान्य केली.

कलमे जामीनपात्र; बचाव पक्षाचा युक्तिवाद

पुरावा नष्ट केल्याप्रकरणात आरोपींवर लावलेली २०१, २१२ व २१३ ही कलमे जामीनपात्र आहेत, तर कलम ४६७ हे अदखलपात्र असून मौल्यवान वस्तूंच्या बनावटीकरणासाठीच्या यादीत रक्ताच्या नमुन्याचा समावेश होत नाही. आरोपींचे मोबाइल जप्त करण्यात आले आहेत. त्यामुळे त्यांच्या पोलीस कोठडीची गरज नाही, असा युक्तिवाद बचाव पक्षातर्फे अॅड. सुधीर शहा, अॅड. ऋषिकेश गानू आणि अॅड. विपुल दुशिंग यांनी केला. न्यायालयाने तो अमान्य केला.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest