पुणे: जमीन लाटण्यासाठी वडिलांचा खून? कोविड काळात कोरोना झाल्याचे भासवित जीव घेतल्याचा आरोप

पुणे : जमीन लाटण्याकरिता कोविड काळात कोरोनाची लागण झाल्याचे भासवित एका ज्येष्ठ नागरिकाला लोणी काळभोर येथील शिवम रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांचा खून करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

संग्रहित छायाचित्र

हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पुणे : जमीन लाटण्याकरिता कोविड काळात कोरोनाची लागण झाल्याचे भासवित एका ज्येष्ठ नागरिकाला लोणी काळभोर येथील शिवम रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांचा खून करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशानुसार हडपसर पोलीस ठाण्यात भादवि ३०२, ३४ अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये एक पोलीस कर्मचारी, रुग्णालय, मुलगा आणि नातू यांचा समावेश आहे. हा प्रकार २६ मे २०२१ ते २६ जून २०२४ या कालावधीदरम्यान घडला.

नारायण बापू तेलोरे असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी गणेश विलास पोटे (वय ३७, रा. मांजरी ग्रीन अॅनेक्स, हडपसर), विलास नारायण तेलोरे (वय ५७), आकाश विकास तेलोरे (वय २८, दोघे रा. ब्राह्मणी, ता. राहुरी, अहिल्यादेवी नगर), शिवम हॉस्पिटल अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी राजेंद्र नारायण तेलोरे (वय ४५, रा. खळेवाडी, ब्राह्मणी, अहिल्यादेवी नगर) यांनी फिर्याद दिली आहे. पोटे हा पोलीस कर्मचारी आहे. तर, विलास आणि आकाश हे दोघे फिर्यादी यांचे चुलते व पुतणे आहेत. हडपसर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा कन्सल्टन्सीचा व्यवसाय आहे. त्यांनी पुण्याच्या प्रथमवर्ग न्यादंडाधिकारी न्यायालय क्रमांक सातमध्ये फौजदारी किरकोळ अर्ज दाखल केला होता. फिर्यादी हे सध्या नाशिक येथे मुलीसोबत राहतात. त्यांचे आई-वडील मूळ गावी राहात होते. फिर्यादी यांचे वडील नारायण तेलोरे हे वयस्कर असल्यामुळे त्यांना विविध आजारानी ग्रासलेले होते. फिर्यादी नाशिक येथे राहत असल्यामुळे त्यांना सतत गावी जायला जमत नव्हते. त्यांची देखभाल करण्यासाठी तसेच वैद्यकीय देखरेखीसाठी सुनिता बाप भागवत-गुजर यांना केअरटेकर म्हणून कामाला ठेवले होते. तसेच फिर्यादी त्यांच्या वडीलांना अधून मधून नाशिक येथील अपोलो रुग्णालयात तपासणीसाठी घेऊन जात होते. 

साधारण १० मे २०२१ रोजी नारायण तेलोरे यांना गुडघ्याचा व मणक्याच्या उपचारांसाठी नाशिकच्या अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे डॉ. अनिल जाधव यांच्याकडे उपचार घेऊन तसेच तपासणी करून त्यांना ब्राह्मणी येथे घरी पाठवण्यात आले होते. तसेच आईला दम्याचा व अर्धांगवायूचा त्रास होता. त्यांच्या दम्यावर डॉ. प्रवीण ताजणे व अर्धांगवायूवर डॉ. जितेंद्र शुक्ला उपचार करीत होते. त्यादिवशी नारायण यांना सर्दी, खोकला तसेच कोरोनाची कोणतीच लक्षणे दिसत नव्हती. तसेच, त्यांना दवाखान्यात अथवा इतर ठिकाणी जावे लागत असले तर ते फिर्यादी यांना फोन करून सांगत असत. तसेच, केअरटेकर सुनिता हीस सांगून जात असत.

गणेश पोटे हा मांजरी येथे राहण्यास आहे. तर, विलास आणि आकाश हे आई-वडीलांना जमीनीसाठी त्रास देत होते. फिर्यादीचे वडील नारायण आणि अन्य तींन आरोपी यांच्यामध्ये सतत भांडणे होत होती. १४ मे रोजी २०२१ रोजी पोटे याने फिर्यादी अथवा त्यांच्या केअर टेकरला न सांगता नारायण यांना गावावरुन मांजरी येथे आणले. त्यानंतर २६ मे २०२१ रोजी मध्यरात्री एकच्या सुमारास पोटे याने फिर्यादीला नारायण यांना पुण्यात आणले असून शिवम हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याचे कळवले. तसेच, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. हे ऐकताच फिर्यादी यांना धक्का बसला. फिर्यादी तात्काळ रुग्णालयात दाखल झाले. वडिलांचा मृतदेह पाहिला असता त्यांच्या पोटावर शस्त्रक्रिया केल्याचे टाके दिसून आले. त्यांना वडिलांच्या मृत्यूबाबत संशय आला. त्यांनी पोटेकडे याबाबत विचारणा केली. त्यावेली त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, पोटे याने फिर्यादीला वडीलांचा मृत्य कसा झाला? कोणत्या कारणाने झाला? त्यांना काय त्रास होत होता? याबाबत डॉक्टरांकडून माहिती घेऊ दिली नाही. त्याच्या सोबत असलेल्या दोन तीन व्यक्तींनी त्यांना बाजूला नेले. आरोपींनी घाईघाईने नारायण यांचा मृतदेह अंत्यविधीसाठी मांजरी येथील समशानभूमीमध्ये नेला. तिथे नातेवाईकांची वाट न बघता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यास सरवात केली. परंतु, फिर्यादी यांना वडीलांचा मृत्यू संशयास्पद वाटत असल्याने त्यांनी अंत्यविधी करण्याआधी शवविच्छेदन करण्याची विनंती केली. मात्र, त्यांचे काहीही ऐकून घेण्यात आले नाही. 

फिर्यादी पुन्हा शिवम हॉस्पिटल येथे डॉक्टरकडे वडीलांच्या मृत्य बाबत चौकशी करण्यासाठी गेले. त्यावेली डॉक्टरांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली. डॉक्टरने पोटे याला बोलावून घेतले. पोटे याने फिर्यादीस धमकी दिली. फिर्यादी गावी असताना आरोपींनी ‘वडिलांच्या वमृत्यूबद्धल जास्त वार्ता करू नको आणि आमच्या नादाला लागू नको. नाहीतर तुझ्या बापाच्या किडन्या जशा गायब केल्या, तशा तुझ्या पण गायब करून तुला खपवून टाकेल’, अशी धमकी दिली. त्यांना तलवारीने, काठयाने व गजाने तसेच लाथा बूक्याने जबर मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

याबाबत पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक यांना तक्रार अर्ज केला होता. मात्र, त्यावर आजपर्यत कोणतीही दखल घेण्यात आली नाही. तसेच, फिर्यादी शिवम हॉस्पिटलला पत्र देऊन कागदपत्रे देण्याची विनंती केली होती. रुग्णालयाने त्यांना कागदपत्रे न देता टाळाटाळ केली. लोणी काळ्भोर पोलिसांनी देखील त्यांच्या अर्जावर तपास केला नाही. त्यानंतर फिर्यादी यांनी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. न्यायालयाने या अर्जाची दखल घेत पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक निरीक्षक नानासाहेब जाधव करीत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest