पुणे : खडकी ॲम्युनेशन फॅक्टरीतील कामगाराकडे आढळली जिवंत काडतुसे; एका कामगाराला दिघी पोलिसांनी केली अटक; एक पसार

सैन्य दलासाठी दारू गोळा बनविणाऱ्या खडकी ॲम्युनेशन फॅक्टरीतील कामगाराकडे ३१ जिवंत काडतुसे आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. दोन महिने बेपत्ता असणाऱ्या कामगाराच्या दुचाकीच्या डिकीत ही काडतुसे आढळून आल्याने पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

Pune Live cartridges

पुणे : खडकी ॲम्युनेशन फॅक्टरीतील कामगाराकडे आढळली जिवंत काडतुसे; एका कामगाराला अटक; एक पसार

तपास आणि गुप्तचर विभागाकडून चौकशी सुरू

सैन्य दलासाठी दारू गोळा बनविणाऱ्या खडकी ॲम्युनेशन फॅक्टरीतील कामगाराकडे ३१ जिवंत काडतुसे आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. दोन महिने बेपत्ता असणाऱ्या कामगाराच्या दुचाकीच्या डिकीत ही काडतुसे आढळून आल्याने पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

भगवान दत्तात्रय सस्ते (वय ५३, रा. दिघी) असे याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या कामगाराचे नाव आहे. तर त्याचा साथीदार कामगार नितीन किसन माने याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मुकुंद कोकणे या पोलीस हवालदाराने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

भगवान सस्ते हे ९ ऑगस्ट रोजी घरातून निघून गेले होते. तर त्यापूर्वी त्यांना त्यांचा सहकारी मित्र नितीन माने याने त्याची दुचाकी वापरण्यास दिली होती. दिघी पोलीस ठाण्यात सस्ते बेपत्ता असल्याबाबत त्यांचा मुलगा शुभम याने तक्रार दिली होती.

सुमारे दोन महिने पोलीस सस्ते यांचा वेगवेगळ्या पातळीवर शोध घेत होते. सस्ते यांच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनंतर पोलिसांनी माने आणि अन्य काही मित्रांना पोलीस ठाण्यात पाचारण केले होते. या लोकांकडे चौकशी केल्यानंतर ३ ऑक्टोबर रोजी माने हा सस्ते यांना घेऊन पोलीस ठाण्यात आला होता.

यादरम्यान माने याने सस्ते यांना वापरण्यासाठी दिलेली दुचाकी त्यांचा मुलगा शुभम याने १६ ऑक्टोबर रोजी तपासली. तेव्हा त्यामध्ये काही कागदपत्रे आणि एका पिशवीमध्ये सरकारी वापरासाठी असलेले ९ एमएम आकाराचे २९ जिवंत काडतुसे आणि "एसएलआर" बंदुकीतील मोठ्या आकाराचे ३ जिवंत काडतुसे तसेच १ राऊंडचा कोअर आढळून आला.

या पिशवीमध्ये मानेच्या कुटुंबीयांच्या नावे असलेली काही कागदपत्रे, चष्मा देखील होता. त्यामुळे शुभम याने दुचाकीसह खडकी ॲम्युनेशन फॅक्टरी गाठली. गेटवरून त्याने वडिलांना आत मध्ये फोन केला. मात्र वडिलांनी प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर शुभम याने वडिलांचा मित्र माने याला फोन दोघांना बाहेर बोलवले.

त्यानंतर शुभम याने माने यांच्या दुचाकीच्या डिकीत बंदुकीच्या गोळ्या आढळून आल्याचे वडिलांना सांगितले. त्यानंतर काही वेळाने माने देखील तेथे आला. माने याने शुभम यांच्याकडे त्या बंदुकीच्या गोळ्या मागितल्या. तेव्हा भगवान सस्ते यांनी दुचाकी डिकीत बंदुकीच्या गोळ्या (जिवंत काडतुसे) कुठून आल्या अशी विचारणा केली. याच दरम्यान त्या ठिकाणी उमेश गायकवाड नामक अन्य एक व्यक्ती देखील उपस्थित होता. गायकवाड माने याला सर्वप्रथम ती पिशवी ताब्यात घे असे सांगितले.

या सगळ्या प्रकारामुळे शुभम हा दुचाकी घेऊन गेटवर जाऊ लागला. तेव्हा माने आणि गायकवाड यांनी शुभम याला धमकवल्याचे त्याने पोलिसांना दिलेल्या जबाब नमूद करण्यात आले आहे. या सगळ्या प्रकारानंतर शुभम सस्ते हा वडील भगवान सस्ते यांना घेऊन थेट दिघी पोलीस ठाण्यात गेला.

वडील बेपत्ता असल्याने मागील दोन महिन्यापासून शुभम सस्ते हा वारंवार दिघी पोलीस ठाण्यात जात होता. तेथे पोलिसांची ओळख झाली असल्याने तसेच मोठ्या प्रमाणात जिवंत काडतुसे आढळून आल्याने तो वडिलांना घेऊन कडतुसासह पोलीस ठाण्यात दाखल झाला होता. शुभम याने पोलिसांना सर्व घटनेची माहिती दिली.

याप्रकारानंतर माने हा पसार झाला आहे. तर दारूगोळा / शस्त्र बाळगण्याचा कोणताही परवाना नसताना सरकारी दारूगोळा (जिवंत काडतुसे) बाळगल्याप्रकरणी दिघी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दुचाकी माने याची असली तरी त्याचा वापर भगवान सस्ते यांनी काही दिवस केला होता. त्यामुळे पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल करून, सस्ते यांना अटक केली आहे.

माने आणि सस्ते हे दोघे कायमस्वरूपी कामगार असून, त्यांच्यापैकी नेमके कोणी ही काडतुसे बाहेर आणली याचा तपास सध्या पोलिसांसह अन्य तपास आणि गुप्तचर यंत्रणांकडून केला जात आहे. एकाच वेळेस ही काडतुसे बाहेर आणली की रोज एक एक करीत काडतुसे बाहेर आणली याबाबत सैन्य दलाच्या संबंधित यंत्रणेकडून चौकशी केली जात आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest