Pune Hotel Drugs Party: ‘एल थ्री’ बारचा परवाना रद्द

फर्ग्युसन रस्त्यावरील लिक्वीड, लिजर, लाऊंज (एल थ्री) बारमधील झालेली बेकायदा पार्टी, तसेच अमली पदार्थ सेवन करण्यात आल्याची चित्रफीत प्रसारित झाल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाईचा बडगा उगारला असून ‘एल थ्री’ बारचा परवाना रद्द करण्याचे आदेश मंगळवारी (दि. २५) देण्यात आले.

संग्रहित छायाचित्र

फर्ग्युसन रस्त्यावरील या बारमध्ये बेकायदा पार्टी तसेच अमली पदार्थ सेवनप्रकरणी उत्पादन शुल्क विभागाकडून कारवाई

फर्ग्युसन रस्त्यावरील लिक्वीड, लिजर, लाऊंज (एल थ्री) बारमधील (L3 Drugs Party) झालेली बेकायदा पार्टी, तसेच अमली पदार्थ सेवन करण्यात आल्याची चित्रफीत प्रसारित झाल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाईचा बडगा उगारला असून ‘एल थ्री’ बारचा परवाना रद्द करण्याचे आदेश मंगळवारी (दि. २५) देण्यात आले. (Pune Hotel Drugs Party)

फर्ग्युसन रस्त्यावरील ‘एल थ्री’ बारमध्ये रविवारी (दि. २३) मध्यरात्री बेकायदा पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. पार्टीसाठी उत्पादन शुल्क विभागाकडून परवानगी घेण्यात आली नव्हती, तसेच पार्टीत अल्पवयीन मुले सामिल झाली होती. समाजमाध्यमांत ‘एल थ्री ’ बारमधील पार्टी आणि प्रसाधनगृहात काही तरुण अमली पदार्थांचे सेवन करत असल्याची चित्रफीत प्रसारित झाली. त्यानंतर पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली.

पोलिसांनी  याप्रकरणी ‘एल थ्री’ बारचे जागामालक संतोष विठ्ठल कामठे (रा. ४४७/४, रजनीगंधा अपार्टमेंट, शिवाजीनगर), बारचालक उत्कर्ष कालिदास देशमाने (रा. फ्लॅट नं. ३०२, साईप्रसाद अपार्टमेंट लेन नं. १० मुंजाबा वस्ती, धानोरी), योगेंद्र गिरासे (रा. भूगाव), रवी माहेश्वरी (रा. एच १००६, ३८२ पार्क, मॅजेस्टिक, उंड्री), पार्टीचे आयोजक अक्षय दत्तात्रेय कामठे (रा. हडपसर), ध्वनिक्षेपक यंत्रणा सांभाळणारा (डीजे) दिनेश मानकर (रा. नाना पेठ), तसेच पार्टीचे आयोजन करणारे रोहन राजू गायकवाड (रा. भोसले पार्क, हडपसर) आणि मानस मलिक (वय ३३, रा. फ्लॅट नं. ४२, जयजवान नगर, राम मंदिराजवळ, येरवडा) यांना अटक केली.

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकानेही रविवारी सायंकाळी एल थ्री बारमध्ये छापा टाकून सव्वातीन लाख रुपयांचा बेकायदा मद्यसाठा जप्त केला. या प्रकरणी उत्पादन शुल्क विभागाने सहा कर्मचाऱ्यांनादेखील (वेटर) अटक केली. ‘‘कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी उत्पादन शुल्क विभागातील निरीक्षक अनंत पाटील आणि विठ्ठल बोबडे यांना निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत,’’ अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पुणे कार्यालायचे अधीक्षक चरणसिंह राजपूत यांनी ‘सीविक मिरर’ला दिली.

फर्ग्युसन रस्त्यावरील इमारतीतील तळमजला आणि पहिल्या मजल्यावर संतोष कामठे यांच्या नावाने ‘हाॅटेल रेनबो’ला मद्य विक्रीचा परवाना मंजूर करण्यात आला आहे. सध्या रेनबो हाॅटेलचे नाव बदलण्यात आले असून,‘एल थ्री’ बार नावाने तेथे व्यवसाय करणात येत आहे. पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी छुपा मार्ग काढून मंजूर नकाशात बदल करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने पाहणी केली. तेव्हा परवाना कक्षात गंभीर स्वरूपाचे फेरबदल करण्यात आले आहेत. परवाना कक्षात अंतर्गत बदल करण्यात आल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने परवान्याचे तत्काळ निलंबन करून बार लाखबंद (सील) करण्यात आला. L3 Drugs Party

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest