Pune Hotel Drugs Party : ‘एल थ्री’ बारवर गुन्हा दाखल

सर्व नियम धाब्यावर बसवून पहाटेपर्यंत बेकायदा मद्य व ड्रग्ज पार्टी करण्यात आलेल्या लिक्वीड लीजर लाउंज (एल थ्री) पब-बारच्या मालकांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात पुणे महापालिकेच्या तक्रारीवरून मंगळवारी (दि. २५) रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.

संग्रहित छायाचित्र

रेनबो हॉटेलच्या पोटमाळ्यावर बेकायदा बांधकाम प्रकरणी महापालिकेने दिली होती शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार

सर्व नियम धाब्यावर बसवून पहाटेपर्यंत बेकायदा मद्य व ड्रग्ज पार्टी करण्यात आलेल्या लिक्वीड लीजर लाउंज (एल थ्री) पब-बारच्या मालकांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात पुणे महापालिकेच्या तक्रारीवरून मंगळवारी (दि. २५) रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. फर्ग्युसन रस्त्यावर असलेल्या रेनबो हॉटेलच्या पोटमाळ्यावर बेकायदा बांधकाम करून त्याठिकाणी ‘एल थ्री’ पब-बार सुरू करीत बांधकाम नियमावलीचा भंग केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बारमालक संतोष विठ्ठल कामठे (रा. रजनिगंधा अपार्टमेंट, शिवाजीनगर), बारचालक रवी माहेश्वरी (रा. ३८२ पार्क, मॅजेस्टिक, उंड्री) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. त्यांच्यावर एमआरटीपी ॲक्ट १९६६ नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणी पुणे महापालिकेचे इमारत निरीक्षक राहुल अजित रसाळे (वय ४३) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फर्ग्युसन रस्त्यावरील रेनबो हॉटेलच्या पोटमाळ्यावर जागामालक कामठे, चालक माहेश्वरी यांनी ‘एल थ्री’ बार सुरू केला होता. पालिकेच्या बांधकाम विभागाकडून कामठे आणि माहेश्वरी यांना २८ मे रोजी या संदर्भात नोटीस बजावण्यात आली होती. महापालिकेने या दोघांना बेकायदा बांधकामासंदर्भात १५ दिवसात खुलासा करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

कामठे आणि माहेश्वरी यांनी महापालिकेकडे समाधानकारक खुलासा सादर केला नाही. या ठिकाणी पार्टी झाल्याचे समोर आल्यानंतर पोलीस, राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाईला सुरुवात केली. राज्य उत्पादन शुल्क विभागाने या ठिकाणी सील लावले होते. महापालिकेच्या अधिकाऱ्यांना कारवाई करायची असल्याने हे सील तात्पुरते काढण्याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाला विनंती करण्यात आली. त्यानुसार, हे सील काढल्यानंतर मंगळवारी (दि. २५) दुपारी दोनच्या सुमारास  बांधकाम विभागाचे उपअभियंता सुनील कदम, कार्यकारी अभियंता बिपीन शिंदे, अतिक्रमण विभागाचे चंद्रकांत कदम आणि कर्मचाऱ्यांनी हे बेकायदा बांधकाम पाडले. उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक धवल गोळेकर यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली.

महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, कामठे आणि माहेश्वरी यांनी रेनबो हॉटेलमधून ‘एल थ्री’ बारमध्ये जाण्यासाठी एक जिना तयार केला होता. हा जिना पोटमाळ्यावर असलेल्या बारमध्ये जात होता. या ठिकाणी बेकायदा बांधकामदेखील करण्यात आले होते. पालिकेच्या पथकाने हे बेकायदा बांधकाम तोडून टाकल्याचे इमारत निरीक्षक रसाळे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली तपास केला जात आहे.

बारमालक संतोष कामठेने मुंबईतून आणले मेफेड्रोन

‘एल थ्री’ बारमध्ये शनिवारी मध्यरात्री ते रविवारी पहाटेपर्यंत झालेल्या पार्टीमध्ये ड्रग्जचे (एमडी) सेवन करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणात कामठे, माहेश्वरी यांच्यासह आठ जणांना अटक झाली आहे. मेफेड्रोनचे सेवन करणाऱ्या नितीन ठोंबरे (वय ३४, रा. गोरेगाव, मुंबई), करण मिश्रा (वय ३४, रा. मुंढवा) यांनादेखील बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. ठोंबरेने मुंबईतून मेफेड्रोन आणल्याचे तपासात समोर आल्याची माहिती पोलिसांनी ‘सीविक मिरर’ला दिली.  

‘एल थ्री’मधील लेटनाईट पार्टीची घोषणा कल्ट पबमध्ये

'एल थ्री' बारमध्ये पार्टीचे आयोजन अक्षय कामठे याने केले होते. याकरिता ऑनलाइन आणि रोख स्वरुपात पैसे घेतले होते. एल थ्री बारमधील पार्टीपूर्वी २३ जून रोजी रात्री रात्री सर्व मुलांनी कल्ट पबमध्ये पार्टी केली होती. कल्ट पबमध्ये पार्टीदरम्यान ‘एल थ्री’मधील लेटनाईट पार्टीची घोषणा कामठेने ध्वनिवर्धकावरुन केली होती. तेथून ‘एल थ्री’ बारमध्ये आलेल्या तरुणांसाठी समाजमाध्यमात ‘पुणे व्हाईब्ज’ नावाने समूह तयार करण्यात आला होता.

'एल थ्री' बारमधील पार्टीत सहभागी झालेल्या तरुणांना पुण्यातील अमली पदार्थ तस्कराने मेफेड्रोनचा पुरवठा केल्याचे समोर आले आहे. तरुणांना मेफेड्रोन विक्री करणाऱ्या तस्कराचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. या गुन्ह्यात पोलिसांनी अमली पदार्थविरोधी कायद्यान्वये (एनडीएपीएस) कलमवाढ केली आहे. आतापर्यंत दहा जणांना अटक करण्यात आली आहे. आरोपी ठोंबरे आणि मिश्रा यांनी पुण्यातून मेफेड्रोन खरेदी केल्याची माहिती तपासात मिळाली आहे. पार्टीत सहभागी झालेल्या नऊ तरुणांचा पोलिसांनी शोध घेतला असून त्यांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत.
- संदीपसिंग गिल, पोलीस उपायुक्त, परिमंडळ एक, पुणे

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest