स्वारगेट परिसरात तंबाखू गुटखा व्यापाऱ्यावर गोळीबार, ४ लाख रुपये पळवले
पुण्यात शहारातील गुन्हेगारी कमी होण्याचे नाव घेत नाही. अशीच गोळीबाराचा घटना बुधवारी रात्री घडली आहे. पुणे शहरातील स्वारगेट चौकात दुचाकीवरून आलेल्या दोन जणांना दुकान चालकावर गोळीबार केला आहे. या घटनेत दुकान चालक व्यापारी जखमी झाला आहे. त्यांना दोन गोळ्या लागल्या आहेत. तर आरोपी ४ लाख रुपये घेवून पळून गेले आहेत.
लतेश हसमुखलाल मोदी उर्फ सुरतवाला (वय ५२, रा. माणिकबाग) असे जखमी झालेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे. ते तंबाखूचा व्यवसाय करत होते. पुणे पोलीस झोन २ च्या डीसीपी स्मार्तना पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश कला क्रीडा मंच येथे दोघेजण टू व्हीलरवरून जात होते. त्यांच्या बाजूने एक रिक्षा चालत होती. त्या रिक्षातील एकाने दुचाकीवर मागे बसलेल्या व्यक्तीवर गोळीबार केलेला आहे. ती व्यक्ती तंबाखू गुटख्याची व्यापारी म्हणजेच लतेश मोदी हे होते.
लतेश हे व्यवसायातील जमलेले चार लाख रुपये एका बॅगेत ठेवून ते दुचाकीवरुन घरी निघाले होते. त्यांचा नोकरही बरोबर होता. रात्री नऊ ते सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास आरोपींनी त्यांच्यावर गोळीबार केला. त्यातील एक गोळी त्यांच्या पाठीत तर दुसरी मांडीत शिरली. ते तेथेच कोसळले. त्यांच्याकडील ४ लाख रुपयांची बॅग घेऊन चोरटे पळून गेले. या घटनेनंतर त्यांना जवळील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर घटनास्थळी रक्ताचे डाग आणि तीन गोळ्या आढळून आल्या आहेत. या घटनेतील आरोपीचा शोध सुरू असून या हल्ल्यामागील अद्याप कारण समजू शकले नाही.
दरम्यान, या अगोदर देखील लतेश यांना दोनवेळा अडविण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र, याबाबत कोणत्याही प्रकारची तक्रार पोलीसांत दाखल केली नव्हती, अशी माहिती पोलीसांनी दिली आहे. आता पुन्हा एकदा त्यांच्यावर गोळीबार झाला आहे. यात ते जखमी असले तरी त्यांची प्रकृती स्थिर आहे. स्वारगेट पोलीस सध्या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.