स्पाईस फॅक्टरी हॉटेलमध्ये ग्राहकांना मारहाण
नितीन गांगर्डे
कोंढवा परिरसरात एनआयबीएम रस्त्यावरील क्लोव्हर हिल्स प्लाझा येथील स्पाईस फॅक्टरी या हॉटेलमध्ये वेटर आणि इतर कर्मचाऱ्यांनी ग्राहकांना बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. बिअरच्या बाटल्या, हुक्का पॉट, डोक्यात घातल्याने तीन जण जखमी झाले आहेत. तसेच चाकूनेही वार केल्याचे फिर्यादींनी सीविक/ पुणे मिररशी बोलताना सांगितले. या प्रकरणी हुजेफा मुस्तफा अतरवाला (वय 38 वर्षे, रा. गंगा फ्लोरेन्टीना) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अतरवाला यांच्यासह त्यांचे मित्र अनिकेत परदेशी आणि राम त्यागी हे जखमी झाले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अतरवाला यांची महमंदवाडी कॉल सेंटर कंपनी आहे. शुक्रवारी दुपारी पावणेचार वाजता ते आणि त्यांची मैत्रिण स्पाईस फॅक्टरी येथे जेवण करण्यासाठी गेले होते. जेवण झाल्यावर बिल देण्यासाठी गेले असताना त्यांना १७६.५० रुपये सर्व्हिस चार्ज लावल्याचे दिसले. त्यांनी याबाबत बिलींग काऊंटरला असलेल्या महिलेस विचारणा केली. त्यांनी मॅनेजर सोबत बोलण्यास सांगितले. त्याप्रमाणे अतरवाला यांनी मॅनेजरला विचारणा केली. यावर मॅनेजरने त्यांना "तुम्ही भिकारी लोक आहात, झोपडपट्टीत लोक आहात, तुम्हाला पैसे बुडवायचे आहेत, तुम्हाला बील भरायचे नाही म्हणून काही कारण काढून वाद घालत आहात, असे म्हणून भांडायला सुरूवात केली.
फिर्यादी अतरवाल यांनी वाद टाळण्यासाठी तुमच्या मालकांशी बोलायचे आहे, असे सांगितले. यावर मॅनेजरने त्यांना शिवीगाळ सुरू केली. ते आणि त्यांच्यासोबतचे तीन-चार वेटर त्यांच्या अंगावर धावून आले. संपूर्ण बिल भरल्याशिवाय जाऊ देणार नाही, अशी धमकी दिली. यावर अतरवाला यांनी त्यांचे मित्र अनिकेत परदेशी आणि राम त्यागी यांना फोन करून बोलावून घेतले. हे दोघे आल्यावर मॅनेजर व वेटर यांना वाटले की ते भांडणे करण्यास आले आहेत. त्यांनी वाद आणखी वाढविण्यास सुरवात केली. त्यावेळी तेथे हॉटेलचे पाच ते सहा कर्मचारी गोळा झाले. त्यापैकी एकाने अतरवाला यांच्या डोक्यात काचेची बरणी व बीअरची बाटली मारली. त्यामुळे त्यांच्या डोक्याला मार लागला. त्यात झालेल्या जखमेतून मोठा रक्तस्त्राव होत होता. झटापटीत मानेवर, गळ्यावर व पायालाही मार लागला आहे. अनिकेत यांच्या डोक्यात कठीण वस्तू मारली. तसेच राम त्यागी यास डोक्यात आणि बोटावर धारदार शस्त्राने मारहाण केली.
अतरवाला यांनी ‘मिरर’शी बोलताना सांगितले की, ही घटना सायंकाळी चार वाजता झाली. पोलीसांनी तक्रार नोंदवून घेण्यास विलंब केला. गुन्हा दाखल करून घेण्यास पोलीस टाळाटाळ करत होते. मध्यरात्री साडेतीन वाजता गुन्हा दाखल करून घेतला. माझ्यासोबत असलेली मैत्रीण डॉक्टर आहेत. त्यांचाही आरोपींनी धक्काबुक्की करत विनयभंग केला. मात्र, पोलीसांनी याबाबतचा गुन्हा नोंदवूून घेतला नाही. हॉटेल मधील १० कर्मचाऱ्यांचे टोळके बेभानपणे मारहाण करत होते. यात आमचा जीवही गेला असता. आम्ही जेवण करायला गेलो होतो. शांततेत सगळ्या गोष्टी करत होतो मात्र येथील कर्मचारी आमच्या शांत बोलण्यावरही रागाने बेफाम होऊन वाईट भाषेत बोलत होते. त्यांनी आम्हाला बेदम मारहाण केली. त्यात मला गंभीर जखमा झाल्या आहेत. अंगावरील कपडे रक्ताने भिजले होते. याप्रकरणी पोलिसांकडे गेल्यावर पोलीस गुन्हा दाखल करताना किरकोळ गुन्ह्याचे कलम लावत होते. त्यांना योग्य ते कलम लावण्यासाठी बराच वेळ विनंती करावी लागली. येथील सीसीटीव्ही फुटेज दाखविण्यासही पोलीस तयार नाहीत. पोलीस आरोपीना पाठीशी घालत होते. घटना दुपारी ४ वाजता घडली मात्र गुन्हा दाखल करून घ्यायला पोलिसांनी पहाटेचे ३ : ३० वाजवले. पोलीस ठाण्यातील पोलीस आम्हाला सांगत होते तुम्हाला भारतीय दंड संहितेतील कलम ३०७ नुसार गुन्हा दाखल करायचा असेल तर तुम्ही सकाळी या. आता पोलीस निरीक्षक नाहीत ते आल्यावर तुमची तक्रार द्या". अशी माहिती फिर्यादीने मिररला दिली.
सहाय्यक पोलीस निरिक्षक दिनेश पाटील यांनी सांगितले की ग्राहकाबरोबर झालेल्या किरकोळ वादातून हॉटेलमधील कामगारांनी मारहाण केली आहे. हॉटेल मालकाचा याच्याशी संबंध नाही. मारहाण करणारे आरोपी हे येथील कर्मचारी असून काही महाराष्ट्रा बाहेरील आहेत. यातील दोघांना अटक करण्यात आली असून इतरांना लवकरच अटक करण्यात येईल.
याप्रकरणी सहायक पोलीस आयुक्त शाहूराव साळवे यांना विचारले असता सीविक/ पुणे मिररशी बोलताना ते म्हणाले की, यातील फिर्यादी हे उच्च शिक्षित आहेत. त्यांनी दिलेल्या फिर्यादी प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. त्यांनी हकीगत सांगितल्या प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. घटना घडल्या नंतर फिर्यादी जखमी असल्याने त्यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरु होते. अशा प्रकरणात उपचार वेळेवर तातडीने करणे आवश्यक असते. फिर्यादी पोलीस ठाण्यात आल्याबरोबर गुन्हा दाखल केला आहे. त्यासाठी कसलाही विलंब करण्यात आला नाही.