संग्रहित छायाचित्र
पुणे : 'दर महिन्याला पाच हजार रुपयांचा हप्ता द्या, नाहीतर हॉटेल फोडून टाकेल' अशी धमकी देत हॉटेल चालकाच्या गळ्यातील अडीच तोळ्यांची सोनसाखळी जबरदस्तीने हिसकावून नेल्याप्रकरणी तिघा जणांविरोधात येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी साडेआठ वाजण्याच्या सुमारास विमान नगर येथील जे एमडी फास्ट फूडमध्ये घडली.
पोलिसांनी अखिल उर्फ ब्रिटिश अनिल पालांडे (वय २५, रा. माणिक कॉलनी, धानोरी गाव, विश्रांतवाडी), ओंकार टिंगरे (वय २६) आणि त्यांच्या आणखी एका साथीधाराविरोधात जबरी चोरी आणि खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी राणी हरेनसिंग संधू (वय ५१, रा. आर्य कॉलनी, विमान नगर) यांनी फिर्याद दिली आहे. राणी संधू यांचे विमान नगर मध्ये जेएमडी फास्टफूड नावाचे हॉटेल आहे.
या ठिकाणी आलेल्या तिघा आरोपी अखिल याने 'प्रत्येक महिन्याला पाच हजार रुपये द्यायचे सांगितले होते ना... मग का नाही दिले?' अशी विचारणा केली. 'तुम्हाला माहित आहे ना... मी इथला किती मोठा गुंडा आहे. आत्ताच्या आत्ता पाच हजार रुपये द्या. नाहीतर तुमचे हॉटेल फोडून टाकीन आणि यापुढे देखील हॉटेल चालवायचे असेल तर दर महिन्याला पैसे द्यायचे लक्षात ठेवा' अशी धमकी दिली. त्यांनी पैसे देण्यास नकार दिला असता हाताने मारहाण करण्यात आली. त्यांच्या गळ्यातील अडीच तोळे वजनाची सोनसाखळी जबरदस्तीने ओढून घेण्यात आली. 'पैसे देत नाही ना तर चेन घेऊन जातो' असे म्हणून हॉटेलच्या बाहेर निघून गेला. त्यानंतर त्याच्या दोन साथीदारांनी हॉटेलमधील सामानाची तोडफोड केली आणि सर्वांना बघून घेण्याची असे सोडणार नाही अशी धमकी दिली.