अश्विनी कोस्टाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी आणल्यावर तिचे आर्त दर्शन घेणारी तिची आई आणि नातेवाईक, बाजूच्या छायाचित्रात मृत अनिश अवधियाचा चुलत भाऊ पारस सोनी आणि अश्विनीचे वडील.
माझी निष्पाप मुलगी. तिचा यात काय दोष होता. कायदा मोडणाऱ्याच्या चुकीने तिचा बळी गेला. आता आम्ही काय करायचे, असे म्हणत कल्याणीनगरमधील कार अपघातात बळी गेलेल्या अश्विनी कोस्टाची आई ममता कोस्टा यांनी हंबरडा फोडला. रुग्णवाहिकेतून अश्विनीचे पार्थिव ससून रुग्णालयाच्या शवागारात आल्यावर त्यांचा आक्रोश पाहून सर्वांच्याच डोळ्यात पाणी आले.
कल्याणीनगर येथील एका हॉटेलमधून मोटारसायकलवरून घरी जात असताना भरधाव कारच्या धडकेत अनिश अवधिया आणि अश्विनी कोस्टा या संगणक अभियंत्यांचा मृत्यू झाला.
अश्विनी ही मूळची मध्य प्रदेशातील जबलपूर येथील आहे. तिने पुण्यातील वाडिया महाविद्यालयातून कॉम्प्युटर सायन्समध्ये पदवी घेतली होती. अनिश अवधियाने डीवाय पाटील कॉलेजमधून कॉम्प्युटर सायन्समध्ये बीई केले होते. दोघेही जॉन्सन कंट्रोल या कंपनीत काम करत होते. त्यातून त्यांची मैत्री झाली होती. अश्विनीने नोकरी सोडली होती आणि तिच्या गावी जाण्याचा निर्णय घेतला होता. अपघातानंतर दोघांना येरवडा येथील सह्याद्री रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. त्यांचे मृतदेह रविवारी दुपारी ४ वाजता शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात आणले. या अपघाताची माहिती समजल्यावर अश्विनीचे आई-वडील आणि लहान भाऊ मोटारीने जबलपूरहून नागपूरला आणि तेथून विमानाने पुण्याला आले. मुलीचे शेवटचे दर्शन घेताना ममता कोस्टा यांना आक्रोश अनावर झाला होता. रुग्णवाहिकेत असलेल्या अश्विनीला त्या उठविण्याचा प्रयत्न करत होत्या. तोंडावर फटके मारून घेत होत्या.
‘ सीविक मिरर’शी बोलताना ममता कोस्टा म्हणाल्या, पहाटे चारच्या सुमारास आम्हाला अश्विनीच्या मोबाईलवरून कॉल आला आणि घटनेची माहिती मिळाली. आम्ही लगेच पुण्याला रवाना झालो. अश्विनी खूप हुशार होती. लॉकडाऊनच्या काळात तिला नोकरी मिळाली होती. त्यानंतर बरेच दिवस ती घरून काम करत होती. सहा महिन्यांपूर्वी ती पुण्याला आली होती. आम्ही तिला सांगायचो की जास्त काम करू नकोस, थोडासा ब्रेक घेत जा. शनिवारी रात्रीही ती माझ्याशी बोलली होती. तिने १८ जूनला जबलपूरला येण्याचे तिकीट काढले होते. तिच्या वडिलांचा वाढदिवस होता. तिला त्यांना सरप्राईज द्यायचे होते. ही दुर्दैवी घटना घडली आणि देवाने तिला आमच्यापासून हिरावून नेले. माझ्या मुलीच्या जन्मकुंडलीत दीर्घायुष्य लिहिले होते. अश्विनीचा भाऊ संप्रित म्हणाला, “आम्हाला खूप मोठा धक्का बसला आहे. कालचे आमचे झालेले बोलणे शेवटचे ठरले. आम्ही पप्पांच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनची जंगी तयारी केली होती.
अनिस अवधियाचा चुलत भाऊ पारस म्हणाला, आम्हाला आज पहाटे फोन आला आणि धक्काच बसला. अनिशचे आई-वडील वृध्द आहेत. त्यांची काळजी घेणारे कोणी नाही. त्यामुळे त्यांना अगोदर या घटनेची माहिती दिली नव्हती.
पारस सोनी म्हणाले, अनिश हा शिक्षणात टाॅपर होता. त्याला परदेशी नोकरीसाठी जायचे होते. कॉम्प्युटर कोडिंगमध्ये तो एक्सपर्ट होता. आमचे व्यापारी कुटुंब आहे. अनिशच्या वडिलांचा प्रींटिंग प्रेसचा व्यवसाय आहे. आमच्या कुटुंबातील अनिस हा पहिला आयटी इंजिनिअर होता.