आईच्या डोळ्यादेखत टँकरच्या धडकेत जुळ्या मुलींचा मृत्यू
विश्रांतवाडी (vishrantwadi accident) येथील मुकुंदराव आंबेडकर चौकात सिग्नल सुटल्यानंतर दुचाकीला टँकरची (Pune Accident) धडक बसून झालेल्या अपघातात साडेतीन वर्षांच्या जुळ्या मुलींचा जागीच मृत्यू झाला, तर आई गंभीर जखमी झाली. या अपघातातील दोषी टँकरचालकाला पोलिसांनी तब्यात घेतले असून त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती विश्रांतवाडी पोलीस (vishrantwadi police) ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय भापकर यांनी ‘सीविक मिरर’ला दिली.
View this post on Instagram
मुकुंदराव आंबेडकर चौकात दुचाकी चालक संतोषकुमार झा हे पत्नी आणि जुळ्या मुलींसह घरी भोसरीकडे जात होते. याचवेळी सिग्नल सुटताच शेजारी उभ्या असलेल्या हिंदुस्तान पेट्रोलियमचा टँकरची धडक दुचाकीला बसली त्यामुळे झा डावीकडे तर पत्नी किरण (वय ३८) तसेच श्रद्धा आणि साक्षी उजवीकडे पडले. काही कळायच्या आता तिघांच्या अंगावरून टँकरचे चाक गेले. यात श्रद्धा आणि साक्षी यांचा जागीच मृत्यू झाला, तर किरण या गंभीर जखमी झाल्या. संतोषकुमार झा या अपघातातून बचावले. या प्रकरणी टँकरचालक प्रमोद यादव (वय ३६, रा. उत्तर प्रदेश ) याला पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यावेळी अपघाताच्या ठिकाणी मोठी गर्दी झाली होती. दरम्यान या अपघाताबाबत कळताच पुण्याचे अप्पर पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे, सहायक पोलीस आयुक्त आरती बनसोडे यांनी घटनास्थळाला भेट दिली.
संतोषकुमार झा भोसरी येथे राहात असून ते डिओ या दुचाकीवरून येरवड्यात एका खासगी रुग्णालयात आले होते. त्यांच्यासोबत पत्नी आणि दोन जुळ्या मुली होत्या. त्यांनी दुचाकीच्या पुढे मातीचे पोते ठेवले होते. टँकरचा दुचाकीच्या हँडलला धक्का बसताच संतोषकुमार यांचे दुचाकीवरील नियंत्रण गेले. त्यामुळे ते चौकात डावीकडे तर पत्नी आणि मुली उजवीकडे पडल्या. यावेळी क्षणार्धात टँकरचे चाक तिघांवरून गेल्याचे प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी सांगितले. अधिक तपास पोलीस निरीक्षक भालचंद्र ढवळे करीत आहे.
गेल्या तीन महिन्यांत येरवडा आणि विश्रांतवाडी परिसरात झालेल्या अपघातात लहान चाके असलेल्या ॲॅक्टिव्हासारख्या दुचाकींचा समावेश होता, अशी माहिती येरवडा वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक शैलेश संख्ये यांनी दिली.