संग्रहित छायाचित्र
पुणे : कोंढवा पोलीस ठाण्यात माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी हिंदू संघटनेने केली होती. यामागणीसाठी संघटनेने आंदोलन देखिल केले होते. या आंदोलनाची दखल घेत कोंढवा पोलिसांकडून जलील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करुन घेत जालना जिल्ह्यात वर्ग केली आहे.
औरंगाबादचे नामकरण छत्रपती संभाजीनगर झाल्यानंतर जलील यांच्याकडून तिरंगा रॅली काढण्यात आली होती. या रॅलीमध्ये संभाजी महाराज यांची बदनामी व जाणीवपूर्वक अपमान करण्यात आल्याचा आरोप केला जात आहे. जलील यांच्याच सांगण्यावरूनच रॅलीमधील जमावाने छत्रपती संभाजी महाराज यांच्या 'छत्रपती संभाजीनगर-जालना' महामार्गावरील नामनिर्देशित फलकावरील छत्रपती संभाजीनगर या नावाला काळे फासून विद्रूपीकरण केले होते. ही घटना जलील यांनीच घडवून आणली असा आरोप हिंदू संघटनने केले होते. याप्रकरणी गुन्हा दाखल करुन घेण्यासाठी संघटनेने आंदोलन केले होते. मंगळवारी (दि.१) विविध हिंदू संघटनाच्या पदाधिकाऱ्यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करून घेण्यासाठी गर्दी केली होती. पदाधिकाऱ्यांच्या मागणीनुसार मंगळवारी रात्री उशिरापर्यंत कोंढवा पोलिसांत गुन्हा नोंद
प्रक्रिया सुरू केली होती. गुन्हा हा आपल्या भागात घडला नाही. मात्र, पदाधिकाऱ्यांनी केलेल्या मागणीनुसार त्याची दखल घेत गुन्हा नोंद करुन घेण्यात जालना पोलिसांकडे वर्ग केला आहे.
माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात होती. त्यांच्यावर ठेवण्यात आलेल्या आरोपानुसार संबंधित घटना आपल्या भागात घडली नाही. त्यामुळे संघटनेने केलेल्या मागणीनुसार गुन्ह्याची नोंद करण्यात आली. त्यानंतर हा गुन्हा जालना पोलिसांकडे वर्ग केला आहे.
- विनय पाटणकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कोंढवा पोलिस ठाणे.