संग्रहित छायाचित्र
पोलीस असल्याची बतावणी करून गळ्यातील सोन्याची चेन आणि अंगठी बटव्यामध्ये ठेवण्यास सांगून तो बटवा डिक्कीत व्यवस्थित ठेवला आहे की नाही, हे पाहण्याचा बहाणा करून चोरट्याने हातचलाखी करून बटव्यातील ८० हजार रुपयांचे दागिने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे.
काळुराम बबन वाडकर (वय ५५, रा. भेकराईनगर) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार तुळशीबाग ते मंडई दरम्यान सार्वजनिक रस्त्यावर २७ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेसात वाजता घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी वाडकर हे विक्रेते आहे. ते व्यवसाय करण्याच्या ठिकाणी गाडीतील विक्रीचा माल उतरवून थांबले होते. त्यावेळी एक जण आला. त्याने पोलीस असल्याची बतावणी केली. फिर्यादी यांच्या गळ्यातील सोन्याची चेन, हातातील सोन्याची अंगठी बटव्यामध्ये ठेवण्यास सांगितले. तो बटवा फिर्यादी यांच्या गाडीतील डिक्कीमध्ये ठेवण्यास सांगितले. त्याप्रमाणे त्यांनी बटवा ठेवला असता त्या वस्तू व्यवस्थित ठेवल्या आहेत का, हे पाहण्याचा बहाणा केला आणि बटवा हातचलाखीने काढून घेऊन निघून गेला. काही वेळाने ८० हजार रुपयांच्या या वस्तू डिक्कीत नसल्याचे वाडकर यांच्या लक्षात आले. पोलीस उपनिरीक्षक नरवडे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.